Chandrapur : शहरातील एका २४ वर्षीय तरुणाच्या मृत्यूनंतर अवघ्या काही तासांतच स्मशानभूमी परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि संशयास्पद प्रकार समोर आला आहे. अंत्यसंस्कार आटोपून कुटुंबिय घरी परतल्यानंतर, रात्रीच्या अंधारात नदीपात्रात काही व्यक्ती संशयास्पद पूजाविधी करत असल्याचे उघडकीस आले.
हा प्रकार ‘अघोरी विधी’ किंवा जादूटोणा असल्याच्या संशयावरून तेथे आलेल्या काही तरुणांनी पूजा करणाऱ्यांना जाब विचारला, ज्याचे रूपांतर नंतर भीषण हाणामारीत झाले. या मारहाणीत तिघेजण गंभीर जखमी झाले असून सेल्लूर घाट परिसरात सध्या प्रचंड खळबळ उडाली आहे.
रात्री ८ वाजता स्मशानभूमीत अचानक खळबळ!
प्राप्त माहितीनुसार, पोंभूर्णा येथील एका २४ वर्षांच्या युवकाचे निधन झाल्यानंतर २९ मे रोजी सेल्लूर घाटावरील स्मशानभूमीत त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. अंत्यविधी आटोपून मृत युवकाचे नातेवाईक आणि सर्व गावकरी घरी परतले.
मात्र, त्याच रात्री ८ वाजण्याच्या सुमारास काही लोक पूजा साहित्य घेऊन नदीपात्रात काहीतरी विशेष विधी करत असल्याची गुप्त माहिती स्थानिक नागरिकांना मिळाली. माहिती मिळताच काही जागरूक युवक तातडीने घटनास्थळी पोहोचले.
अघोरी कृत्याचा संशय आणि राडा…
तरुण जेव्हा नदीपात्रात पोहोचले, तेव्हा त्यांना अशोक शांतया पुष्पुलवार (वय ५५, रा. पोंभूर्णा), सुरेश भाऊजी दिवसे (वय ५२, रा. चेक बल्लारपूर) आणि विनोद गोपीनाथ चिताडे (वय ५१, रा. गोंडपिंपरी) हे तिघे जण वेगवेगळ्या साहित्यासह पूजाविधी करताना रंगेहात मिळून आले.
तेथे आलेल्या तीन अनोळखी तरुणांनी या तिघांवर मृताच्या आत्म्याशी संबंधित किंवा कोणतातरी अघोरी विधी करत असल्याचा थेट आरोप केला. यावरून दोन्ही गटांमध्ये आधी जोरदार शाब्दिक वाद झाला आणि काही वेळातच या वादाचे रूपांतर लाथाबुक्क्यांनी होणाऱ्या हाणामारीत झाले. या मारहाणीत पूजा करणारे तिन्ही वृद्ध गंभीर जखमी झाले.
गुप्तधनाचा शोध की अंधश्रद्धा? पोलीस तपास सुरू!
या घटनेत जखमी झालेल्या अशोक पुष्पुलवार, सुरेश दिवसे आणि विनोद चिताडे यांना तातडीने पोंभूर्णा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना सुटी देण्यात आली.
या प्रकरणाची माहिती मिळताच पोंभूर्णा पोलिसांनी तातडीने घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. जखमी अशोक पुष्पुलवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या तीन अज्ञात तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू केला आहे.
दरम्यान…
स्मशानभूमीतील या रहस्यमय पूजाविधीचा नेमका हेतू काय होता, याबाबत परिसरात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. अनेकांनी या प्रकाराचा थेट संबंध ‘गुप्तधन’ शोधण्याच्या अघोरी प्रयत्नांशी जोडला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे अधिकृत आवाहन प्रशासनाने केले आहे.