Steps to recover money after cyber crime : ऑनलाईन आर्थिक फसवणुकीला (Cyber Fraud) बळी पडणाऱ्या नागरिकांसाठी केंद्र सरकारने एक अत्यंत दिलासादायक आणि मोठा निर्णय घेतला आहे. सायबर चोरांनी लंपास केलेले पैसे परत मिळवण्यासाठी आता पीडित व्यक्तीला कोर्ट किंवा बँकांचे उंबरठे झिजवण्याची गरज भासणार नाही.
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या ‘भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राने’ (I4C) दोन अत्याधुनिक डिजिटल पोर्टल्स कार्यान्वित केले आहेत. या नवीन यंत्रणेमुळे चोरलेली रक्कम गोठवणे आणि ती पुन्हा तक्रारदाराच्या खात्यात वळवणे ही गुंतागुंतीची प्रक्रिया आता अत्यंत जलद, पारदर्शक आणि सुटसुटीत होणार आहे.
काय आहेत ही दोन नवीन पोर्टल्स?
अधिकृत माहितीनुसार, सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि नागरिकांना न्याय देण्यासाठी खालील दोन प्रणाली सुरू करण्यात आल्या आहेत:
मनी रिस्टोरेशन मॉड्यूल (MRM) | Steps to recover money after cyber crime
सायबर फसवणुकीत गेलेली रक्कम तातडीने जप्त करून ती थेट मूळ बँक खात्यात सुरक्षितपणे परत पाठवण्यासाठी ‘एमआरएम’ (MRM) हे मॉड्यूल विकसित केले गेले आहे. पूर्वी न्यायालयीन प्रक्रियेमुळे जप्त केलेले पैसे परत मिळण्यास प्रचंड विलंब व्हायचा, मात्र आता डिजिटल सुविधेद्वारे ही रक्कम थेट खात्यात जमा होईल.
ग्रीव्हन्स रिड्रेसल मेकॅनिझम (GRM)
अनेकदा तपासादरम्यान सायबर पोलिसांकडून संशयास्पद बँक खाती गोठवली (Freeze) जातात. अशा फ्रिज केलेल्या खात्यांबाबतच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी ‘जीआरएम’ पोर्टल काम करेल.
बँका आणि पोलिसांमध्ये थेट ताळमेळ
अनेकदा सायबर पोलिसांनी फसवणुकीची रक्कम बँक खात्यात गोठवूनही, बँकांच्या अंतर्गत तांत्रिक अडचणींमुळे ती पैसे तक्रारदाराला मिळण्यास अडथळे यायचे. ही अडचण दूर करण्यासाठी मुंबई कार्यक्षेत्रातील सर्व सायबर पोलीस ठाणी आणि स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांना या नव्या पोर्टल्सचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे.
आता पोलीस, संबंधित बँका आणि राष्ट्रीय सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल यांच्यात थेट समन्वय साधला जाणार असून, एका निश्चित कालमर्यादेत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पैसे ग्राहकाला मिळवून दिले जातील.
नागरिकांना घरबसल्या मिळणार ऑनलाईन सुविधा
मुंबईचे सायबर पोलीस उपायुक्त बजरंग बनसोडे यांनी म्हटले की, “नागरिक आता पोलिसांच्या मार्गदर्शनाने किंवा स्वतः देखील ‘एमआरएम’ पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करून आपले पैसे मिळवू शकतात.
फक्त संबंधित बँकेने रिस्टोरेशनची माहिती त्यांच्या प्रणालीमध्ये अद्ययावत करणे गरजेचे आहे. तसेच, ज्या नागरिकांची बँक खाती पोलिसांनी गोठवली आहेत, त्यांनी आपल्या बँकेशी संपर्क साधून ‘जीआरएम’ पोर्टलद्वारे तक्रार नोंदवावी.”
डिजिटल जगात सतर्कता बाळगणे हाच आर्थिक सुरक्षिततेचा उत्तम उपाय आहे!
अशाच नवनवीन सायबर सुरक्षा टिप्स, सरकारी योजना, तंत्रज्ञान क्षेत्रातील घडामोडी आणि महाराष्ट्रातील ताज्या व खळबळजनक बातम्यांचे अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा.