Chandrapur Crime News : रविवारच्या शांत संध्याकाळी चंद्रपूर पोलिसांच्या आपत्कालीन क्रमांकावर (Dial 112) अचानक हा थरारक कॉल खणखणला. एका महिलेचा खून झाल्याची गंभीर बातमी मिळताच पडोली पोलीस ठाण्याचे पथक क्षणाचाही विलंब न लावता लखमापूर येथील कथित घटनास्थळाकडे रवाना झाले. मात्र, जेव्हा पोलीस पथक त्या घरात घुसले, तेव्हा समोरचे दृश्य पाहून पोलिसांचेही डोळे पांढरे झाले!
बायको जिवंत पाहून पोलीस चक्रावले! | Chandrapur Crime News
ज्या पत्नीचा खून झाल्याचे पतीने सांगितले होते, ती पत्नी पोलिसांसमोर चक्क जिवंत आणि सुखरूप उभी ठाकली! हा प्रकार पाहून पोलिसांना मोठा धक्का बसला. अंजुराम शाहू (वय ३९, रा. लखमापूर) असे या अफलातून ड्रामा रचणाऱ्या पतीचे नाव आहे. अंजुराम हा मागील दोन दिवसांपासून कमालीच्या दारूच्या नशेत होता. रविवारी संध्याकाळी ७ वाजता तो पूर्णपणे शुद्ध हरपलेल्या अवस्थेत होता.
पोलिसांनी जेव्हा त्याच्या पत्नीकडे चौकशी केली, तेव्हा तिने सांगितले की, “माझे पती दोन दिवसांपासून प्रचंड दारू प्यायलेले असून त्यांनी पोलिसांना पूर्णपणे खोटी माहिती दिली आहे.” या खुलाशानंतर पोलिसांचा जीव भांड्यात पडला असला, तरी एका मद्यपीमुळे संपूर्ण यंत्रणेची मोठी धावपळ झाली.
तपास करायला गेलेल्या पोलिसांवरच धावला अंगावर!
खोट्या माहितीमुळे पोलिसांचा वेळ वाया घालवणाऱ्या अंजुरामला जेव्हा पोलिसांनी जाब विचारला, तेव्हा नशेत असलेल्या अंजुरामने थेट खाकी वर्दीशीच हुज्जत घालण्यास सुरुवात केली. तो एवढ्यावरच थांबला नाही, तर थेट पोलिसांच्या अंगावर धावून गेला. पोलिसांनी स्वतःचा बचाव केला, मात्र त्याच गडबडीत अंजुरामचा स्वतःचा तोल गेला आणि तो घरासमोर ठेवलेल्या लाकडी सरपणावर (इंधनावर) जाऊन आदळला, ज्यामुळे त्याच्या पायाला किरकोळ दुखापत झाली.
Also Read : अमरावतीत मध्यरात्री तरुणाची हत्या; पैशांच्या वादातून भरचौकात चाकू हल्ला
यंत्रणेची दिशाभूल भोवली; कडक कलमांन्वये गुन्हा दाखल
शासकीय कर्तव्यावर असताना पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करणे आणि ‘डायल ११२’ प्रणालीचा गैरवापर केल्याबद्दल रामनगर पोलिसांनी आरोपी अंजुराम शाहू विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १३२, २१२ आणि २२१ अन्वये गंभीर गुन्हा दाखल केला आहे. या संपूर्ण कारवाईत पडोलीचे पीएसआय रोशन इरपाचे, पोलीस अंमलदार सचिन पोहनकर आणि वामन शेंडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
पोलीस अधीक्षकांचा कडक इशारा :
११२ क्रमांक ही सुविधा नागरिकांना त्वरित मदत मिळावी यासाठी २४ तास खुली असते. असे खोटे कॉल करून यंत्रणेची दिशाभूल करणाऱ्यांवर यापुढे कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.
— आयुष नोपाणी, पोलीस अधीक्षक, चंद्रपूर
Also Read :अमरावती बसस्थानकात धक्कादायक चोरी! महिलेचे 70 ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास
“आपत्कालीन सेवा ही खेळण्याची वस्तू नाही!”
‘डायल ११२’ सारख्या यंत्रणा एखाद्या गरजूचे प्राण वाचवण्यासाठी असतात. दारूच्या नशेत किंवा मजेसाठी अशा यंत्रणांचा गैरवापर करणे हा केवळ गुन्हा नसून सामाजिक बेजबाबदारपणाचे लक्षण आहे. चला, एक जबाबदार नागरिक बनूया आणि शासकीय यंत्रणेचा आदर करूया!