Amravati Crime News : अमरावतीत मध्यरात्री थरार! पैशांच्या वादातून तरुणाची भरचौकात निर्घृण हत्या
अवघ्या काही तासांत गुन्हे शाखेने आरोपींच्या आवळल्या मुसक्या; शुक्रवार बाजारातील धक्कादायक घटना!
अमरावती : ऐन मध्यरात्री अमरावतीचे शुक्रवार बाजार क्षेत्र रक्ताने माखले. पैशांच्या देवाणघेवाणीच्या किरकोळ वादाचे रूपांतर एका भयानक हत्याकांडात झाले असून, सय्यद नाझिम नावाच्या ३८ वर्षीय तरुणाची तीक्ष्ण शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली आहे. या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, मृत सय्यद नाझिम आणि आरोपी निशांत भोवते यांच्यात पैशांच्या व्यवहारावरून फोनवर शाब्दिक चकमक उडाली होती. हा वाद मिटवण्यासाठी नाझिम मदिना मांडा सेंटरजवळील गल्लीत गेला असता, तिथे आधीच दबा धरून बसलेल्या निशांत भोवते (२७) आणि यशराज कोरी (२६) यांनी नाझिमवर हल्ला चढवला. आरोपींनी नाझिमच्या गळ्यावर, ओठावर आणि कपाळावर चाकूने सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या नाझिमला तातडीने इर्विन रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
पोलिसांची ‘ॲक्शन मोड’मध्ये एन्ट्री
घटनेची माहिती मिळताच अमरावती पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक सतर्क झाले. पीआय संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तांत्रिक माहिती आणि खबऱ्यांच्या आधारे पोलिसांनी चक्रा फिरवली. पसार होण्याच्या बेतात असलेल्या दोन्ही मुख्य आरोपींना पोलिसांनी अवघ्या काही तासांत सापळा रचून बेड्या ठोकल्या. न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
Also Read :अमरावती बसस्थानकात धक्कादायक चोरी! महिलेचे 70 ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास
मृताचा गुन्हेगारी इतिहास | Amravati Crime News
पोलीस तपासात समोर आले आहे की, मृत सय्यद नाझिम हा प्लंबिंगचे काम करत असला तरी त्याच्यावरही यापूर्वी खुनासारखे गंभीर गुन्हे दाखल होते. जुन्या वादातून किंवा वर्चस्व वादातून हे हत्याकांड घडल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
ठळक मुद्दे:
घटनास्थळ: शुक्रवार बाजार परिसर, अमरावती.
कारण: पैशांच्या देवाणघेवाणीचा वाद.
शहर पोलिसांनी या प्रकरणी अत्यंत वेगाने तपास करून आरोपींना अटक केल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत असले, तरी अशा घटनांमुळे रात्रीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.