Nagpur Matrimonial Fraud : इंटरनेटच्या जमान्यात ऑनलाईन फसवणुकीचे नवनवीन फंडे वापरून नागरिकांना लुटणाऱ्या सायबर गुन्हेगारांचे जाळे दिवसेंदिवस अधिकच गडद होत चालले आहे. नागपूर शहरातील अत्यंत उच्चभ्रू वस्ती मानल्या जाणाऱ्या ‘सिव्हिल लाईन्स’ परिसरातील एका सुशिक्षित तरुणीला अशाच एका आंतरराष्ट्रीय सायबर भामट्याने आपल्या जाळ्यात ओढले आहे.
लग्नाचे खोटे आमिष दाखवून आणि भावनिक साद घालत या ठकबाजाने तरुणीची तब्बल ४६ लाख ९७ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. वडिलांची हक्काची जमीन विकून आलेली कष्टाची पुंजी या भामट्यासाठी खर्च केल्याने पीडित तरुणीला आता जबर मानसिक धक्का बसला आहे.
रील्स आणि मॅट्रिमोनीचा असा रचला सापळा
पीडित तरुणीने २०२५ मध्ये एका नामांकित मॅट्रिमोनी साईटवर विवाहासाठी आपली नोंदणी केली होती. याच वेळेत तिने सोशल मीडियावर एक रील पाहिली. त्या रीलमध्ये एका तरुणाने ‘मी इंग्लंडमध्ये मोठा व्यावसायिक असून मला भारतात घर खरेदी करून कायमचे स्थायिक व्हायचे आहे’ अशी बतावणी केली होती. या रीलवर विश्वास ठेवून तरुणीने त्याच्याशी संपर्क साधला.
काही दिवसांतच त्याने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. विश्वास संपादन करण्यासाठी त्याने “मी तुझ्या नावावर ११ हजार पौंड (परदेशी चलन) ट्रान्सफर करत आहे” असे सांगून बनावट कागदपत्रेही पाठवले.
Also Read : ‘गुगल’वर स्वस्त सिमेंट शोधणे पडले महाग; नागपूरच्या उद्योजकाला सायबर भामट्यांनी लावला २.३० लाखांचा चुना!
तुकड्या-तुकड्यांमध्ये उकळले ४६ लाख ९७ हजार रुपये!
आरोपीने ती रक्कम भारतात आल्यानंतर तुला मिळेल, असे सांगितले. त्यानंतर भारतात येण्यासाठी, कर भरण्यासाठी किंवा घर खरेदीसाठी अशी वेगवेगळी कारणे सांगत त्याने तरुणीकडून वेळोवेळी मोठे पैसे उकळण्यास सुरुवात केली.
तरुणीने त्याच्यावर विश्वास ठेवून वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये ८ लाख, १३ लाख ४० हजार, १३ लाख ६० हजार आणि १८ लाख २० हजार रुपये आरोपीने सांगत असलेल्या बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर केले.
ही मोठी रक्कम जमा करण्यासाठी तरुणीला आपली वडिलोपार्जित जमीन विकावी लागली होती.
वर्ष उलटून गेल्यानंतरही तो भारतात न आल्याने तरुणीने जेव्हा त्याच्याकडे पैशांचा तगादा लावला, तेव्हा त्या भामट्याने तिच्याशी असलेले सर्व संपर्क तोडून टाकले.
म्हैसूर, दिल्ली आणि बिहारमध्ये गेले पैसे; पोलिसांत गुन्हा दाखल | Nagpur Matrimonial Fraud
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने तात्काळ नागपूर सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून प्राथमिक तपासात अचंबित माहिती पुढे आली आहे.
सायबर गुन्हेगाराने ट्रान्सफर करून घेतलेली ही रक्कम म्हैसूर, नवी दिल्ली आणि बिहारमधील विविध बँक खात्यांमध्ये जमा झाली आहे.
सायबर पोलीस आता या प्रकरणी बँकांशी कनेक्ट करून या आंतरराष्ट्रीय टोळीचा शोध घेत आहेत.
Also Read : हुंड्याच्या हव्यासाने कॅनडातही सोडले नाही; विवाहितेचे १४ तोळे सोने हडपल्याचा आरोप
सावधान!
“मॅट्रिमोनी साईट्स अथवा सोशल मीडिया यावरून ओळख झालेल्या अनोळखी लोकांवर कधीही विश्वास ठेवू नये. लग्नाचे आमिष दाखवून पैशांची मागणी करणाऱ्या व्यक्तींपासून नेहमी सावध राहा. कोणतीही मोठी रक्कम ट्रान्सफर करण्यापूर्वी समोरच्या व्यक्तीची कौटुंबिक व व्यावसायिक पार्श्वभूमी प्रत्यक्ष पडताळून पाहणे हीच तुमची खरी सुरक्षा आहे!”
अशाच नवनवीन सायबर क्राईमच्या घटना, ऑनलाईन सुरक्षेचे नियम, कायदेशीर कायदे आणि नागपूरसह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींच्या विश्वासार्ह बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा.