Nagpur Cement Scam : ‘गुगल’वर प्रत्येक गोष्टीचा शोध घेणे किती महागात पडू शकते, याची प्रचिती देणारी एक धक्कादायक घटना नागपुरात समोर आली आहे. एका नामांकित सिमेंट कंपनीचा बनावट पुरवठादार बनून सायबर भामट्यांनी नागपुरातील एका तरुण उद्योजकाला तब्बल २ लाख ३० हजार रुपयांना गंडा घातला आहे. ही घटना राणाप्रताप नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, याप्रकरणी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार अजिंक्य अजय जोशी (वय २७, रा. भाऊसाहेब सुर्वे नगर) हे एक खाजगी व्यावसायिक आहेत. त्यांची लिथियम बॅटरी उत्पादन करणारी कंपनी आहे. त्यांच्या कंपनीच्या इमारतीचे बांधकाम एमआयडीसी बुटीबोरी येथे सुरू असल्याने त्यांना मोठ्या प्रमाणावर सिमेंटची गरज होती.
असा रचला सायबर भामट्यांनी सापळा!
बांधकामासाठी स्वस्त दरात सिमेंट मिळावे यासाठी अजिंक्य यांच्या वडिलांनी २२ मे रोजी गुगलवर सिमेंट पुरवठादारांचा शोध सुरू केला. गुगल सर्चच्या याच डेटाचा गैरफायदा घेत सायबर गुन्हेगारांनी अजिंक्य यांच्याशी संपर्क साधला. एका मोबाईल क्रमांकावरून फोन करून आरोपीने स्वतःला एका नामांकित सिमेंट कंपनीचा अधिकृत डीलर असल्याचे भासविले.
सुरुवातीला दुसऱ्या एका प्रतिनिधीने एका सिमेंट बॅगची किंमत ३०० रुपये सांगितली होती. मात्र, मुख्य आरोपी विपिन गुप्ता याने स्वतःला ‘एम पी बिर्ला परफेक्ट’ कंपनीचा प्रतिनिधी सांगून तीच सिमेंट बॅग अवघ्या २३० रुपयांत देण्याची आकर्षक ऑफर दिली. बाजारापेक्षा इतका स्वस्त दर पाहून अजिंक्य यांनी लगेच १००० सिमेंट बॅगची ऑर्डर दिली.
पैसे मिळताच फोन बंद; दुसऱ्या दिवशी पुन्हा पैशांची मागणी!
विश्वास संपादन करण्यासाठी आरोपीने व्हॉट्सॲपवर एक बनावट बिल पाठवून व्यवहार खरा असल्याचा देखावा केला. त्यानंतर अजिंक्य यांनी आरोपीच्या सांगण्यावरून एचडीएफसी (HDFC) बँकेच्या खात्यावर २ लाख ३० हजार रुपये आरटीजीएस (RTGS) द्वारे जमा केले.
पैसे खात्यात पडल्यानंतर आरोपीने सिमेंट डिलिव्हरीची पावती पाठवण्याचे आश्वासन दिले, मात्र प्रत्यक्षात कोणतीही पावती पाठवली नाही. रक्कम हडप केल्यानंतर आरोपीने फोन उचलणे पूर्णपणे बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अजिंक्य यांनी तातडीने सायबर हेल्पलाईनवर तक्रार नोंदवली.
धक्कादायक बाब म्हणजे, दुसऱ्या दिवशी आरोपीने पुन्हा फोन करून डिलिव्हरीसाठी अतिरिक्त पैशांची मागणी केली. मात्र यावेळी अजिंक्य आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला.
Also Read : हुंड्याच्या हव्यासाने कॅनडातही सोडले नाही; विवाहितेचे १४ तोळे सोने हडपल्याचा आरोप
महत्त्वाची सूचना | Nagpur Cement Scam
गुगल सर्चवर मिळणारे सर्वच मोबाईल नंबर अधिकृत असतात असे नाही. अनेकदा सायबर गुन्हेगार गुगलवर नामांकित कंपन्यांचे बनावट कस्टमर केअर नंबर किंवा पत्ता टाकून ग्राहकांना जाळ्यात ओढतात.
त्यामुळे कोणताही मोठा आर्थिक व्यवहार करताना थेट कंपनीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा स्थानिक कार्यालयात जाऊन खात्री करा. अनोळखी व्यक्तीच्या खात्यात कधीही आगाऊ (Advance) रक्कम पाठवू नका!
व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
अशाच ताज्या, महत्त्वपूर्ण आणि सायबर सुरक्षेच्या महत्त्वाच्या अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा!
