Railway New Rules June 2026 : जर तुम्ही रेल्वेने वारंवार प्रवास करत असाल आणि तुम्हाला रात्री उशिरा जेवण्याची किंवा रात्रीच्या वेळी गरमागरम चहा-कॉफी पिण्याची सवय असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
भारतीय रेल्वेच्या गाड्यांमध्ये आतापर्यंत २४ तास अविरत सुरू राहणाऱ्या पॅन्ट्री कार सेवेला (खाद्यपदार्थ आणि पेय सेवा) रेल्वे प्रशासनाने ब्रेक लावला आहे. रेल्वे बोर्डाने घेतलेल्या नवीन निर्णयानुसार, आता रात्रीच्या एका विशिष्ट वेळेत प्रवाशांना कोणतीही खाद्यसेवा दिली जाणार नाही.
नेमकी वेळ काय? कधी बंद राहणार पॅन्ट्री कार?
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री ११ ते सकाळी ६ या कालावधीत पॅन्ट्री कारमधून कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ, चहा, कॉफी किंवा अगदी गरम पाणी मिळणेही पूर्णपणे बंद राहील.
हा निर्णय आधीच घेण्यात आला असला, तरी १ जूनपासून या नियमाची अत्यंत काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे. त्यामुळे मध्यरात्रीनंतर प्रवाशांना चहा किंवा जेवणासाठी सकाळी ६ वाजेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
का घेण्यात आला हा कठोर निर्णय?
रेल्वेने हा निर्णय प्रवाशांच्या आरोग्यासाठी आणि त्यांच्या सोयीसाठीच घेतला असून त्यामागे दोन मुख्य कारणे आहेत:
स्वच्छता आणि जंतुनाशक मोहीम | Railway New Rules June 2026
पॅन्ट्री कार २४ तास सुरू राहत असल्यामुळे रेल्वेच्या या धावत्या किचनच्या स्वच्छतेकडे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष होत होते. परिणामी, साफ़सफ़ाई व्यवस्थित न झाल्याने खाण्यापिण्याच्या वस्तू शुद्ध आणि चांगल्या दर्जाच्या नसल्याच्या अनेक तक्रारी रेल्वे बोर्डाकडे ऑनलाइन ॲपद्वारे दररोज येत होत्या.
आता रात्रीच्या या ७ तासांच्या बंद काळात पॅन्ट्री कारची सखोल स्वच्छता, निर्जंतुकीकरण (Sanitization) आणि इतर दुरुस्तीची कामे केली जातील.
प्रवाशांच्या शांत झोपेत अडथळा नको
रेल्वेमध्ये रात्री साडेदहा-अकरानंतर बरेच प्रवासी झोपेत असतात. अशा वेळी पॅन्ट्री कारचे वेंडर डब्या डब्यांमध्ये येऊन मोठमोठ्याने आवाज देत खाद्यपदार्थ विकतात, ज्यामुळे गाढ झोपलेल्या प्रवाशांच्या शांततेत भंग होतो. हा त्रास थांबवण्यासाठी रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.
प्रवाशांवर काय परिणाम होणार? ‘हे’ नियोजन करणे गरजेचे!
या नवीन नियमाचा सर्वाधिक फटका लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसण्याची शक्यता आहे. अनेकदा प्रवाशांना रात्री उशिरा भूक लागते किंवा चहा-कॉफीची तलफ येते; मात्र आता त्यांना ट्रेनमध्ये ही तात्काळ सुविधा मिळणार नाही.
त्यामुळे कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांनी प्रवासाला निघण्यापूर्वीच आपल्यासोबत आवश्यक खाद्यपदार्थ आणि पिण्याच्या पाण्याची बाटली सोबत ठेवण्याचे नियोजन करणे गरजेचे ठरणार आहे.