Fake Seeds Scam Wardha ; खरीप हंगामाच्या तोंडावर बोगस बियाणे, बनावट खते आणि कीटकनाशकांच्या काळ्याबाजाराला चाप लावण्यासाठी वर्धा जिल्हा कृषी विभागाने अत्यंत आक्रमक पाऊल उचलले आहे. जिल्ह्यातील कृषी केंद्रांमध्ये होणारी संभाव्य बोगसगिरी आणि शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी प्रशासनाने एका विशेष मोहिमेत तब्बल ५५४ कृषी केंद्रांची अचानक झाडाझडती (तपासणी) घेतली.
या झाडाझडतीदरम्यान गंभीर अनियमितता आणि नियमबाह्य कारभार आढळून आल्याने कृषी विभागाने तात्काळ ४२ केंद्रांचे परवाने निलंबित केले असून, ३५ केंद्रांना ‘कारण दाखवा’ नोटिसा बजावल्या आहेत.
नियम मोडणाऱ्यांना कोणताही सुट नाही!
कृषी विभागाने धडक कारवाई करत तपासणी दरम्यान २३० बियाणे आणि ३४ खतांचे नमुने गोळा करून ते प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवले आहेत. ज्या ३५ केंद्रांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, तिथे प्रामुख्याने नोंदवही न ठेवणे, दर फलक न लावणे आणि आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसणे अशा त्रुटी आढळून आल्या. जिल्ह्यात एकूण १ हजार २१७ कृषी केंद्रे असून, वर्षअखेरीपर्यंत या सर्व केंद्रांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट जिल्हास्तरीय भरारी पथकाने ठेवले आहे. ३० जूनपर्यंत ही मोहीम पूर्ण केली जाईल.
Also Read : ‘नीट’ पेपरफुटीवरून वर्ध्यात पेटल्या मशाली! युवक काँग्रेस आक्रमक, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
दोन प्रकरणांत थेट एफआयआर (FIR) दाखल!
बियाण्यांच्या बेकायदेशीर साठवणुकीबाबत प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. जिल्ह्यात कापसाच्या बियाण्यांची अनधिकृत विक्री करणाऱ्यांवर कारवाई करत आतापर्यंत तब्बल ४७ लाख रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला असून, दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये थेट पोलीस तक्रार (FIR) दाखल करण्यात आली आहे.
परवाने रद्द केलेल्या केंद्रांवर कृषी विभागाचे उच्च अधिकारी कडक ‘वॉच’ ठेवून आहेत. खरीप हंगामात नफेखोरी, लिंकिंग किंवा कोणतीही फसवणूक खपवून घेतली जाणार नाही, असा कडक इशारा प्रशासनाने दिला आहे.
Also Read | Wardha Accident News : बुडणाऱ्या भाच्याला वाचवले, पण मामावरच काळाचा घाला.
शेतकऱ्यांना महत्त्वाचे आवाहन आणि तक्रार केंद्र | Fake Seeds Scam Wardha
सध्या जिल्ह्यात मान्सून दाखल झाला नसला तरी खतांच्या टंचाईमुळे बळीराजा चिंतेत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी कोणतीही कृषी निविष्ठा खरेदी करताना अधिकृत पक्के बिल आवर्जून घ्यावे आणि बियाण्यांच्या पिशव्या व पावत्या सुरक्षित ठेवाव्यात. काही शंका किंवा फसवणूक झाल्यास तात्काळ तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
“शेतकरी हा आपल्या देशाचा अन्नदाता आहे. आपल्या घामाचे दाम देऊन खरेदी केलेले बियाणे किंवा खत बोगस निघणे म्हणजे शेतकऱ्याच्या संपूर्ण वर्षाच्या पाठीवर वार करण्यासारखे आहे. एक जागरूक शेतकरी म्हणून नेहमी पक्के बिल घेण्याचा आग्रह धरा. प्रशासनाच्या या मोहिमेला साथ द्या आणि कोणत्याही गैरप्रकाराविरुद्ध आवाज उठवा!”
अशाच नवनवीन शासकीय कृषी योजना, बियाणे-खत वाटप, पावसाचे अपडेट्स आणि वर्धा जिल्ह्यातील ताज्या घडामोडींच्या विश्वासार्ह बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा.
