Chandrapur Fraud : शहरात गुन्हेगारांनी फसवणुकीचा एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक मार्ग शोधून काढल्याची घटना समोर आली आहे. “आम्ही पोलीस अधिकारी आहोत, शहरात विशेष मोहीम सुरू आहे,” अशी बतावणी करत दोन भामट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाला भररस्त्यात गाठले.
त्यांच्याकडून बनावट ओळखपत्राचा धाक दाखवून तब्बल ८ तोळे सोन्याचे दागिने अत्यंत चलाखीने लांबवले. सोमवारी सकाळी भानापेठ वॉर्ड परिसरात घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण चंद्रपूर शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दूध घेऊन घरी परतताना गाठले
मिळालेली माहिती अशी की, अजय अडगुडवार (रा. भानापेठ वॉर्ड, चंद्रपूर) हे सोमवारी सकाळी गांधी चौक परिसरातील एका दूध डेअरीतून नेहमीप्रमाणे दूध घेऊन आपल्या घराकडे पायी परतत होते. त्याच वेळी दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी त्यांना रस्त्यात अडवले.
आम्ही पोलीस खात्यात कार्यरत आहोत असे सांगत या तरुणांनी अडगुडवार यांच्यासमोर एक बनावट ओळखपत्र (ID Card) सादर केले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे अडगुडवार काही क्षणासाठी भांबावून गेले.
‘अंगावर सोने घालण्यास मनाई’ चा बहाणा आणि हाताची सफाई
त्या भामट्यांपैकी एकाने शहरात गुन्हेगारीच्या घटना वाढल्याचे सांगून वरिष्ठांच्या आदेशानुसार अंगावर सोन्याचे दागिने घालून फिरण्यास मनाई असल्याची थाप मारली.
“हे सर्व दागिने सुरक्षितपणे वाहनाच्या डिकीमध्ये ठेवा, अन्यथा दंडात्मक कारवाई होईल,” अशी भीती त्यांनी अडगुडवार यांना दाखवली. त्यांच्या बोलण्यावर पूर्ण विश्वास ठेवून अडगुडवार यांनी आपल्या अंगावरील सुमारे ८ तोळे सोन्याचे दागिने काढून दिले.
दागिने काढून कागदाच्या पुडीत ठेवत असतानाच, भामट्यांनी अत्यंत चलाखीने अडगुडवार यांचे लक्ष दुसरीकडे वळवले. अवघ्या काही सेकंदांत त्यांनी सोन्याचे दागिने असलेली खरी पुडी गायब केली आणि हुबेहूब दिसणारी दुसरी रिकामी पुडी त्यांच्या हातात ठेवून दिली.
हा प्रकार इतक्या सफाईदारपणे घडला की अडगुडवार यांना याचा सुगावाही लागला नाही. पुडी हातात दिल्यानंतर काही क्षणांतच दोघेही दुचाकीवरून सुसाट पसार झाले.
डिकी उघडली अन पायाखालची जमीनच सरकली!
भामटे निघून गेल्यानंतर काही अंतरावर पोहोचताच अजय अडगुडवार यांना संशय आला. त्यांनी तातडीने आपल्या वाहनाची डिकी उघडून ती पुडी तपासली. पुडी उघडताच त्यांना मोठा धक्का बसला, कारण त्यात सोन्याच्या दागिन्यांऐवजी केवळ रिकामा कागद होता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी थेट शहर पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगितली.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांचा तपास सुरू
अडगुडवार यांच्या तक्रारीवरून चंद्रपूर शहर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या गंभीर प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी गांधी चौक व भानापेठ परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेजची तपासणी सुरू केली आहे. आरोपींची ओळख पटवून त्यांना बेड्या ठोकण्यासाठी पोलिसांची विशेष पथके कामाला लागली आहेत.
Also Read : Chandrapur : स्मशानभूमीत अघोरी विधीचा संशय; अंत्यसंस्कारानंतर काही तासांतच रंगला थरार, तिघे जखमी.
वाचकांसाठी आवाहन | Chandrapur Fraud
रस्त्यात कोणीही ‘पोलीस’ असल्याचे सांगून दागिने उतरवण्यास सांगत असेल, तर अशा व्यक्तींवर अजिबात विश्वास ठेवू नका. तातडीने जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधा, जेणेकरून अशा फसवणुकीपासून स्वतःचा बचाव करता येईल.