देशाच्या नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली जनगणना प्रक्रिया आता अधिक कडक करण्यात आली आहे. जर तुम्ही जनगणनेसाठी आलेल्या प्रगणकाला माहिती देण्यास नकार दिला किंवा मुद्दाम खोटी माहिती दिली, तर तुम्हाला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते. जनगणना कायदा, १९४८ च्या कलम ११ (१) (ड) नुसार हा एक गंभीर गुन्हा मानला जातो.
नेमकी शिक्षा आणि दंड काय?
या कायद्यानुसार, दोषी आढळलेल्या व्यक्तीला एक हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. मात्र, प्रकरण गंभीर असल्यास थेट तीन वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद देखील करण्यात आली आहे. त्यामुळे प्रगणक जेव्हा आपल्या घरी येतील, तेव्हा त्यांना विचारलेल्या ३१ ते ३४ प्रश्नांची अचूक उत्तरे देणे प्रत्येक नागरिकासाठी कायद्याने बंधनकारक आहे.
का महत्त्वाची आहे तुमची माहिती? | Maharashtra जनगणना 2026
जनगणना हे केवळ एक सरकारी काम नसून ते एक ‘राष्ट्रीय कर्तव्य’ आहे.
नियोजन: देशाची प्रगती, शिक्षण आणि आरोग्य सुविधांच्या नियोजनासाठी अचूक आकडेवारीची गरज असते.
सरकारी लाभ: सरकारी योजनांचा लाभ कोणापर्यंत आणि किती प्रमाणात पोहोचवायचा, हे जनगणनेच्या आधारेच ठरवले जाते.
राजकीय पुनर्रचना: लोकसभा आणि विधानसभेच्या मतदारसंघांची पुनर्रचना याच डेटावर आधारित असते.
रोजगार: गरिबी निर्मूलन आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी लोकसंख्येची सामाजिक-आर्थिक स्थिती जाणून घेणे आवश्यक असते.
माहिती पूर्णपणे गोपनीय आणि सुरक्षित
अनेकांना आपली खाजगी माहिती देण्यास भीती वाटते, मात्र घाबरण्याचे कारण नाही. जनगणना कायदा, १९४८ नुसार नागरिकांनी दिलेली सर्व माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाते. आता ही सर्व प्रक्रिया ‘डिजिटल’ पद्धतीने होत असून प्रगणक माहिती नोंदवण्यासाठी मोबाईल ॲपचा वापर करत आहेत.
घरी बसून करा- ‘स्वगणना’ (Self-Enumeration) Website : https://se.census.gov.in/
प्रगणकांची वाट न पाहता तुम्ही स्वतः देखील आपली माहिती भरू शकता.
१. अधिकृत वेबसाइटवर जाऊन मोबाईल नंबरने लॉगिन करा.
२. ओटीपी आल्यानंतर प्रश्नावलीमध्ये सर्व माहिती अचूक भरा.
३. माहिती सबमिट केल्यावर मिळणारा नंबर जपून ठेवा.
४. जेव्हा प्रगणक घरी येतील, तेव्हा फक्त तो नंबर दाखवा, ज्यामुळे तुमची माहिती पुन्हा भरावी लागणार नाही.
लक्षात ठेवा, नाव, वय, शिक्षण, धर्म, घराचा प्रकार आणि रोजगाराची स्थिती यांसारख्या प्रश्नांची उत्तरे देताना ती पूर्णपणे खरी असणे आवश्यक आहे, अन्यथा फौजदारी कारवाई होऊ शकते.