Chandrapur Crime News : उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये आपल्या चिमुकलीसह माहेरी आलेल्या एका ३६ वर्षीय विवाहित महिलेची अज्ञात इसमाने झोपेतच धारदार शस्त्राने गळा चिरून अत्यंत निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथील वेकोलिच्या (WCL) धोपटाळा कामगार वसाहतीत घडलेल्या या थरारक हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात कमालीची दहशत आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
माहेरच्या घरी एकट्या असल्याचा घेतला फायदा
मिळालेल्या माहितीनुसार, शीतल रणधीर कुंभारे (वय ३६, रा. महाकाली कॉलनी, कपिल चौक, चंद्रपूर) असे मृत महिलेचे नाव आहे. शीतल या उन्हाळ्याच्या सुट्यांचा आनंद घेण्यासाठी धोपटाळा टाऊनशिपमधील क्वॉर्टर क्रमांक ५२/२ येथील आपल्या माहेरी आल्या होत्या. २८ मे रोजी रात्री त्यांच्या आई आणि भाऊ देवदर्शनासाठी बाहेरगावी गेले असल्यामुळे घरात केवळ शीतल आणि त्यांची लहान मुलगी हे दोघेच होते.
याच रात्री शीतल यांची मुलगी शेजारच्या दुसऱ्या खोलीत गाढ झोपलेली होती. याचाच फायदा घेऊन एका अज्ञात नराधमाने मध्यरात्रीच्या सुमारास घरात बेकायदेशीरपणे प्रवेश केला. खोलीत गाढ झोपेत असलेल्या शीतल यांच्यावर त्याने धारदार शस्त्राने अचानक हल्ला चढवला. हल्लेखोराने थेट गळ्यावर वार केल्याने प्रचंड रक्तस्त्राव होऊन शीतल यांचा जागीच वेदनादायक मृत्यू झाला.
सकाळी घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ!
हा सर्व धक्कादायक प्रकार २९ मे रोजी सकाळी उशिरा समोर आला, जेव्हा आजुबाजूच्या लोकांना संशयास्पद हालचाल निदर्शनास आली.
या भीषण घटनेची माहिती मिळताच राजुरा पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला शीतल यांचा मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला आणि तो पुढील उत्तरीय तपासणीसाठी पाठवला.
पोलिसांकडून तपास गतीने सुरू; आरोपीचा शोध जारी | Chandrapur Crime News
मृत महिलेचे पती रणधीर राजू कुंभारे यांनी दिलेल्या अधिकृत तक्रारीवरून राजुरा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) आणि ३३२(अ) अन्वये हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या हत्याकांडाचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणेदार आसीफराजा बी. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेसह (LCB) पोलिसांची विशेष पथके आरोपीचा माग काढण्यासाठी रवाना करण्यात आली आहेत.
Also Read : ‘मी बायकोचा मर्डर केलाय!’ दारूच्या नशेत पतीचा ११२ वर थरारक कॉल; पण पोलिसांनी घरात पाऊल टाकताच उडाला मोठा गोंधळ!
हा कौटुंबिक वादाचा प्रकार आहे की चोरीच्या उद्देशाने झालेली हत्या, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. वसाहतीमधील सुरक्षिततेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
अश्याच क्राइम विषयी माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा आणि सावधान राहा आणि सर्तक राहा.