Gondia : उच्चशिक्षण घेऊन मोठ्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना जाळ्यात ओढणाऱ्या सायबर भामट्यांचा आणखी एक खळबळजनक कारनामा समोर आला आहे. बेंगलोर येथील नामवंत कंपनीतील नोकरी सोडलेल्या एका इंजिनिअर तरुणाला ‘सिमेन्स’ कंपनीत ‘प्रोजेक्ट मॅनेजर’ (Project Manager) पदाची नोकरी लावण्याचे खोटे आमिष दाखवण्यात आले.
विविध शुल्काच्या नावाखाली या सुशिक्षित तरुणाची तब्बल २ लाख ८५ हजार ६०० रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी गोंदिया शहर पोलिसांनी अज्ञात सायबर गुन्हेगाराविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.
बेंगलोरची नोकरी सोडली आणि अडकला जाळ्यात!
मिळालेल्या माहितीनुसार, गोंदिया येथील रहिवासी असलेल्या उज्ज्वल भोजराज रहांगडाले (वय ३२, रा. अशोक कॉलनी, गणेश नगर) या तरुणाने अभियांत्रिकीचे (Engineering) शिक्षण पूर्ण केले होते. त्याने काही काळ बेंगलोर येथे ‘प्रॉडक्ट मॅनेजर’ म्हणून यशस्वीपणे नोकरी देखील केली होती.
मात्र, जानेवारी २०२५ मध्ये ती नोकरी सोडून तो घरीच नवीन संधीच्या शोधात होता. याच शांततेचा फायदा घेत सायबर गुन्हेगारांनी त्याला आपले सावज बनवले.
६ टप्प्यांत अशी झाली पैशांची लूट | Gondia
१५ मार्च रोजी उज्ज्वलच्या मोबाईलवर एका अज्ञात क्रमांकावरून कॉल आला. कॉल करणाऱ्या महिलेने स्वतःचे नाव ‘पायल शर्मा’ असे सांगितले आणि ती दिल्लीच्या ‘फाउंड इट’ कंपनीतून बोलत असल्याचा दावा केला.
तिने उज्ज्वलला विश्वास दिला की, सिमेन्स कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर पदासाठी मोठी भरती सुरू आहे. त्यानंतर तथाकथित इंटरव्यू घेऊन वेगवेगळ्या कारणांसाठी पैसे उकळण्यास सुरुवात झाली:
- मेंबरशिप फी: सुरुवातीला केवळ ₹६,६०० ऑनलाईन मागितले.
- ट्रेनिंग फी: इंटरव्यू झाल्यानंतर लगेच ₹६२,५०० ची मागणी केली.
- बॅकग्राउंड व्हेरिफिकेशन: प्रोफाइल पडताळणीच्या नावाखाली ₹७०,५०० उकळले.
- मेडिकल स्क्रीनिंग: आरोग्य तपासणीच्या प्रक्रियेसाठी ₹९८,५०० भरण्यास भाग पाडले.
- फायनल डॉक्युमेंटेशन: कागदपत्रांच्या अंतिम मंजुरीसाठी पुन्हा ₹४७,५०० इंडियन बँकेच्या खात्यावर जमा करून घेतले.
अशा प्रकारे एकूण २,८५,६०० रुपये उकळल्यानंतरही जेव्हा आरोपींनी पुन्हा ३ लाख ५५ हजार रुपयांची नवी मागणी केली, तेव्हा मात्र उज्ज्वलच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्याने पुढील पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला.
फोन बंद झाल्यावर उडाला थरकाप; शेवटी पोलिसात धाव!
पैसे देण्यास नकार दिल्यानंतर संबंधित क्रमांकांवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, सर्व मोबाईल क्रमांक बंद असल्याचे आणि समोरून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचे उज्ज्वलच्या लक्षात आले.
आपली फसवणूक झाल्याचे समजताच त्याने त्वरित ‘१९३०’ या सायबर क्राईम हेल्पलाईनवर तक्रार नोंदवली. या प्राथमिक तक्रारीनंतर गोंदिया शहर पोलिसांनी सखोल चौकशी करून अज्ञात भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आमच्या वेबसाईटचा विशेष संदेश
नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांनो, कोणत्याही प्रतिष्ठित कंपन्या सोशल मीडिया किंवा फोनवर थेट पैशांची मागणी करून नोकरी देत नाहीत.
अशा मोठ्या फसवणुकीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी इंटरव्यूपूर्वी पैसे मागणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर किंवा कर्मचाऱ्यांवर आढळा विश्वास ठेवू नका. तुम्ही सतर्क राहणे हेच खूप महत्त्वाचे आहे.