Nagpur Heatwave : विदर्भातील कडक उन्हाने आता थेट माणसांचे जीव घेण्यास सुरुवात केली आहे.नागपूर शहरात आणि सावनेर भागामध्ये उष्माघातामुळे (Heat Stroke) पाच घटना पुढे आल्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण झाले आहे.
शहरातील वेगवेगळ्या भागांत रस्त्याच्या कडेला बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या तीन नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, उन्हाच्या तीव्रतेमुळेच हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. येत्या २५ मे पासून संपूर्ण विदर्भात ‘नवतपा’ म्हणजेच उन्हाचे सगळ्यात कडक ९ दिवस सुरू होत आहेत त्यामुळे पुढील दिवसांमध्ये परिस्थिती अधिक बिकट होणार आहे.
शहरातील वेगवेगळ्या भागात कोसळले मृतदेह
मिळालेल्या माहितीनुसार, उन्हाच्या भीषण लाटेचा फटका रस्त्यावरील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर बसत आहे. शहरातील अजनी, मानकापूर आणि भांडेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे वेदनादायी मृत्यू झाले आहेत:
पहिली घटना (अजनी परिसर) | Nagpur Heatwave
२१ मे रोजी मेडिकल हॉस्पिटलच्या कॅज्युअल्टी विभागाजवळ ६० वर्षांचे एक वृद्ध बेशुद्ध अवस्थेत आढळले. उपचारादरम्यान शनिवार रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
दुसरी घटना (मानकापूर)
मानकापूर स्टेडियमजवळ असेच एक ६० वर्षीय वृद्ध बेशुद्ध पडले होते. त्यांना मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र २२ मे रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
(या दोन्ही मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही.)
तिसरी घटना (भांडेवाडी)
रविवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास भांडेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला.
Also Read : Nagpur बंद घरात आढळले मायलेकीचे कुजलेले मृतदेह; एकाच भागात महिनाभरात तिसरी घटना
सावनेर तालुक्यात खळबळ: महिला आणि मजुराचा अंत
शहराबाहेर सावनेर तालुक्यातही उन्हाने दोन जणांचा बळी घेतला आहे. हमालाचे काम करणाऱ्या एका मजुराचा उन्हाच्या त्रासामुळे मृत्यू झाला, तर परसोडी परिसरातील एका शेतात वृद्ध महिलेचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला. कमालीच्या उष्णतेमुळेच या दोघांचा जीव गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
जवळच्या पोलीस ठाण्यांमध्ये नुकतीच अचानक मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
सावधान! ‘नवतपा’मुळे परिस्थिती होणार अधिक गंभीर
हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार, येत्या २५ मे पासून उन्हाची सगळ्यात जास्त पातळीवर नेणारा ‘नवतपा’ काळ सुरू होत आहे. यामुळे उष्णतेची लाट आणखी भयानक रूप धारण करण्याची शक्यता आहे.
वेबसाईट टीमचे महत्त्वाचे आवाहन:
दुपारच्या वेळी (११ ते ४) अत्यंत महत्त्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नका. सोबत पाण्याची बाटली, छत्री किंवा सुती रुमाल नक्की ठेवा. चक्कर येणे किंवा अस्वस्थ वाटल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा!