Electricity Bill Saving : राज्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून अनेक शहरांमध्ये तापमान ४५ अंशांच्या पुढे गेले आहे. वाढत्या उकाड्यामुळे नागरिकांचा एसी, कूलर, पंखे आणि फ्रिजसारख्या उपकरणांकडे ओढा वाढला आहे. परिणामी, महिन्याच्या शेवटी येणारे वीजबिल सर्वसामान्यांच्या बजेटला मोठा धक्का देत आहे. मात्र, काही साध्या आणि प्रभावी उपायांचा अवलंब केला तर घर थंड ठेवतानाच वीजबिलावरही नियंत्रण मिळवता येऊ शकते.
तज्ज्ञांच्या मते, अनेकजण एसीचे तापमान १८ किंवा १९ डिग्रीवर ठेवतात. त्यामुळे एसीवर अतिरिक्त ताण येतो आणि विजेचा वापरही जास्त होतो. एसीचे तापमान २४ डिग्रीवर ठेवल्यास खोली थंड राहते आणि विजेची बचतही होते. यासोबतच पंख्याचा वापर केल्यास थंड हवा संपूर्ण खोलीत पसरते.
घरातील जुनी किंवा कमी क्षमतेची वायरिंगही विजेचा अपव्यय वाढवू शकते. खराब वायरिंगमुळे शॉर्टसर्किट किंवा आग लागण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे वेळोवेळी इलेक्ट्रिशियनकडून वायरिंगची तपासणी करून घेणे आवश्यक आहे.
बऱ्याच घरांमध्ये टीव्ही, सेट-टॉप बॉक्स, चार्जर किंवा कोणतीही मशीन वापरानंतरही स्टँडबाय मोडवर सुरू राहतात. ही उपकरणे बंद दिसत असली तरी त्यातून वीज खर्च होत असते. त्यामुळे उपकरणांचा वापर झाल्यानंतर प्लग काढण्याची सवय लावणे फायदेशीर ठरते.
उन्हाळ्यात नैसर्गिक हवेचा वापर करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. सकाळी आणि संध्याकाळी खिडक्या उघड्या ठेवल्यास घरात ताजी हवा खेळती राहते आणि उष्णता कमी होते. तसेच, एलईडी बल्ब आणि ऊर्जा बचत करणारी उपकरणे वापरल्यास विजेचा वापर कमी होऊन वीजबिलावरही नियंत्रण मिळते.
थोडी काळजी, योग्य सवयी आणि स्मार्ट वापर यामुळे उष्णतेतही आरामदायी वातावरण राखत मोठ्या प्रमाणात वीज बचत करणे शक्य आहे.