Vidarbha Weather Alert : जर तुम्हाला वाटत असेल की आत्तापर्यंत खूप उकाडा होता, तर येणारे पाच दिवस तुमच्यासाठी अधिक परीक्षेचे असणार आहेत. हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी तीव्र उष्णतेच्या लाटेचा (Heatwave) इशारा दिला असून नागरिकांना प्रचंड दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे. सोमवारी जिल्ह्याचा पारा चक्क ४५.४ अंश सेल्सिअसवर पोहोचल्याने यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवसाची नोंद झाली आहे.
फक्त दिवसच नाही, तर रात्रीही ‘उष्णतेचा टॉर्चर’!
यंदाच्या उन्हाळ्याचे सर्वात धक्कादायक आणि चिंताजनक वैशिष्ट्य म्हणजे दिवसासोबत रात्रीच्या तापमानात झालेली प्रचंड वाढ होय. रात्रीचे तापमान सरासरी २० ते २७ अंशांच्या दरम्यान राहते. मात्र, वाढत्या उकाड्यामुळे रात्रीच्या वेळी घरात कुलर, पंखा किंवा एसी लावूनही अंगाची लाहीलाही होत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, रात्रीचे तापमान थेट ३३.८ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता असल्याने नागरिकांना रात्रीही घरात असह्य उकाड्याचा सामना करावा लागणार आहे.
Also Read : अमरावतीत मध्यरात्री तरुणाची हत्या; पैशांच्या वादातून भरचौकात चाकू हल्ला
आगामी दिवसांतील संभाव्य तापमान | Vidarbha Weather Alert
हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, येत्या काळात सूर्य अधिक कोपणार आहे:
• १९ मे: कमाल तापमान ४४.७ अंश तर किमान ३२.८ अंश राहण्याचा अंदाज.
• २० मे: दिवसाचे तापमान ४५.२ अंश तर रात्रीचे ३३.७ अंश राहण्याची शक्यता.
• २१ व २३ मे: पारा ४४ ते ४५ अंशांच्या आसपास स्थिरावणार.
Also Read : जिल्ह्यात ‘रेन अलर्ट’ ॲपचा धमाका; वीज पडण्यापूर्वीच मिळणार धोक्याचा इशारा
आरोग्य सांभाळा; दुपारच्या वेळी बाहेर पडणे टाळा
या अत्यंत तीव्र हवामानात आरोग्याची काळजी घेणे हेच सर्वात मोठे आव्हान आहे. उष्णतेच्या लाटेमुळे डिहायड्रेशन, उष्माघात (Heat Stroke) आणि चक्कर येणे यांसारखे त्रास उद्भवू शकतात. यासाठी डॉक्टरांनी खालील गोष्टींचे काटेकोर पालन करण्याचा सल्ला दिला आहे:
१. दुपारी बाहेर पडू नका: अत्यंत आवश्यक काम असल्याशिवाय दुपारी १२ ते ४ या वेळेत उन्हात जाणे पूर्णपणे टाळा.
२. पेये वाढवा: भरपूर पाणी प्या. शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी लिंबू पाणी, ताक, मठा आणि शहाळ्याचे पाणी नियमितपणे घ्या.
३. चहा-कॉफी टाळा: उन्हाळ्याच्या दिवसांत शरीरातील उष्णता वाढवणारी चहा आणि कॉफी यांसारखी उत्तेजक पेये घेणे टाळावे.
निसर्गाचा हा प्रकोप पाहता पुढील काही दिवस स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना सतर्क करण्यासाठी ही माहिती आत्ताच व्हॉट्सॲपवर शेअर करा!