जनहित कल्याण संघटनेने केली आर्थिक मदत.
Fire Accident : तालुक्यातील नवरगाव येथे रविवारी दि२९ ऑक्टोबरला सायंकाळी अंदाजे साडेपाच वाजताच्या सुमारास तीन घरांना शॉटसर्किटमुळे आग लागून दीड लाख रुपये रोख व इतर वस्तूंचे मोठे नुकसान झाले.
वयोवृद्ध ७५ वर्षीय सुशीलाबाई देवराव लोणारे यांच्या घराला प्रथम आग लागली. त्यानंतर ही आग शेजारील रामा देवराव लोणारे आणि देवीदास देवराव लोणारे यांच्या घराला आग लागली. ही घटना घडली तेव्हा घरी कुणीच नव्हते. त्यामुळे आग लागल्याची माहिती उशिरा कळाली.
घटनेची माहिती नागरिकांच्या लक्षात येताच, पवन मोहुले,विशाल मार्कंडे ,मोरेश्वर मेश्राम सुरज सोनवले, राकेश नक्षणे वसंता डायरे, आनंद जयस्वाल संजय मोहुले, नितीन लडके,सुरज मार्कंडे यांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. एक तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. या आगीत सुशीलाबाईच्या घरातील धान्य, कपडे, यांचेसह इलेक्ट्रिकल साहित्य, १० ग्रॅम सोने व रोख ८५ हजार रुपये जळाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
तर देवीदास देवराव लोणारे यांचे घरातील गृहोपयोगी वस्तूंसह रोख ५० हजार रुपये जळाले. रामा देवराव लोणारे यांच्या घरातील गृहोपयोगी वस्तू जळून खाक झाल्याची तक्रार देण्यात आली आहे. घटनेचे वृत्त कळताच महसूल विभागाचे व महावितरणच्यावतीने पाहणी करून पंचनामा करण्यात असून जनहित कल्याण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर खुराणा यांना माहिती मिळताच सुशिलाबाई लोणारे यांच्या 25 हजार रुपयांची मदत केली.