Two-Wheeler Theft Case : शहरातील शासकीय रुग्णालय परिसरातून सातत्याने दुचाकी चोरीला जात होत्या. ग्रामीण भागातून आलेल्या गरीब रुग्णांच्या नातेवाइकाला मोठा आर्थिक फटका बसत होता, यामुळे यवतमाळ शहर पोलिसांनी या परिसरात लक्ष केंद्रित करून सलग दीड महिना पाळत ठेवली. त्यानंतर अट्टल चोरटा हाती लागला. त्याच्याकडून तब्बल ११ लाख ३० हजार रुपये किमतीच्या २३ दुचाकी जप्त करण्यात आल्या.
सुभाष गौतम मस्के (५०) रा. वायगाव निपानी जि. वर्धा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सुभाष हा गावात कुठलाही कामधंदा करीत नव्हता. त्याला जुगार खेळण्याचा नाद जडला. जुगारात पैसे हारला की तो यवतमाळला यायचा. शासकीय रुग्णालय परिसरात अनेक दुचाकी नेहमीच उभ्या असतात. भर दिवसाच संधीचा फायदा घेत तो दुचाकीचे कुलूप उघडून पसार व्हायचा.
ती दुचाकी गावाकडे अतिशय कमी किमतीत विकत होता. त्याने खास करून स्प्लेन्डर दुचाकीला लक्ष केले होते. यावरून पाळत ठेवणाऱ्या पोलिसांनी स्प्लेन्डर दुचाकीवर विशेष नजर ठेवली. २ नोव्हेंबर रोजी एमएच- २९- बीवी ४४६५ या क्रमांकाची दुचाकी घेऊन जात असताना सुभाष रुग्णालय परिसरात जमादार अन्सार बेग, किरण पडचण यांच्या हाती लागला.
त्याची कसून चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. नंतर दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी २३ चोरीच्या दुचाकी जप्त केल्या. यातील बहुतांश दुचाकी त्याने अनेकांना विकल्या होत्या. तर काही दुचाकी वायगाव निपाणी जि. वर्धा येथील घरात ठेवलेल्या होत्या.
ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सतीश चवरे, शोध पथकाचे सहायक निरीक्षक संजय आन्नाम, प्रकाश पाटील, उपनिरीक्षक राहुल गृहे, जमादार अन्सार बेग, प्रदीप नाईकवाडे, रावसाहेब शेंडे, किरण पडघण, अश्विन पवार, मिलिंद दरेकर, समाधान कांबळे, देवराव ठाकरे, रवी नेवारे, अंकुश फेंडर, गौतम मनवर, मलनस यांनी केली.