वाशिम महसुल विभागात १ ऑगस्टपासून महसूल सप्ताह.
वाशिम महसुल विभागात १ ऑगस्टपासून महसूल सप्ताह.
फुलचंद भगत
मंगरुळपीर:-महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत नागरीकांना अधिकाधीक माहिती प्राप्त होऊन त्यांना योग्य लाभ घेता यावा. तसेच,त्याबाबत नागरीकांमध्ये जागरूकता वाढावी, शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृध्दींगत व्हावा यासाठी विशेष मोहिम व लोकाभिमूख उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने वाशीम महसूल उपविभागात यावर्षी १ ऑगष्ट ते ७ ऑगष्ट या कालावधीत महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.या सप्ताहादरम्यान उपविभागीय अधिकारी कार्यालय,वाशिमच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
महसूल सप्ताहानिमीत्त १ ऑगष्ट रोजी महसूल संवर्गातील उत्कृष्ठ अधिकारी कर्मचारी यांचा गौरव करून त्यांना प्रशस्तीपत्रे व भेटवस्तू देण्यात येणार आहेत. ०२ ऑगष्ट रोजी युवा संवाद कार्यक्रमातून उपविभागातील विद्याथ्यांना विविध प्रकारचे प्रमाणपत्र वितरित करण्यात येतील.३ ऑगष्ट रोजी ” एक हात मदतीचा ” या कार्यक्रमातून वाशिम उपविभागातील सर्व गावांच्या स्मशानभूमीच्या नोंदी अधिकार,अभिलेख व इतर संबंधित गाव नमुन्यामध्ये अद्यावत करण्यासाठी शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे.
०४ ऑगष्ट रोजी जनसंवाद कार्यक्रमातून उपविभागातील तलाठी यांचेमार्फत सलोखा योजनेअंतर्गत प्रकरणे स्विकारणे तसेच ती प्रकरणे निकाली काढण्यात येणार आहे. ०५ ऑगष्ट रोजी सैनिक हो तुमच्यासाठी या उपक्रमाअंतर्गत संरक्षण दलातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी/कर्मचारी यांच्या समस्याचे निराकरण करण्यात येईल. ०६ ऑगष्ट रोजी महसूल संवर्गातील कार्यरत सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी यांची उपविभागातील विविध प्रलंबीत सेवाविषयक बाबी निकाली काढण्यात येतील.७ ऑगष्ट रोजी महसूल सप्ताहाच्या समारोप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.तरी वाशिम उपविभागातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा.असे आवाहन उपविभागीय अधिकारी,वाशिम यांनी केले आहे.