Maharashtra Cabinet Expansion : विदर्भात सर्वाधिक 3 मंत्रीपदे Yavatmal जिल्ह्याला.
दिग्रस -संजय राठोड-राळेगाव-डॉ. अशोक उईके, पुसद- इंद्रनील नाईक यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ
राज्यात महायुती 2.0 सरकारचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार नागपूर मध्ये राजभवन येथे पार पडला. या शपथविधीने यवतमाळ जिल्ह्यासाठी आनंदाची वार्ता सर्वाधिक तीन मंत्री पद यवतमाळ जिल्ह्याला लाभली आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते संजय राठोड हे दारव्हा विधानसभा मतदारसंघाचे पाचव्या वेळी विधानसभेत प्रतिनिधित्व करताना त्यांना शिवसेनेकडून कॅबिनेट मंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.आदिवासी बहुल राळेगाव विधानसभा मतदारसंघाचे तिसऱ्यांदा प्रतिनिधित्व करणारे डॉ.अशोक उईके यांना दुसऱ्यांदा कॅबिनेट मंत्री पद मिळाले आहे.तर पुसद मधील नाईक घराण्यातील दुसऱ्या पिढीचे नेते आणि दुसऱ्यांदा मोठ्या जनादेशाने निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार इंद्रनील नाईक यांना महायुती सरकारात मंत्रीपद देण्यात आले असून, त्यांना सध्या राज्यमंत्री पद देण्यात आले आहे. विदर्भातून सर्वाधिक तीन मंत्री पद यवतमाळ जिल्ह्याला मिळाली असून,यातून महायुती सरकारने आपल्या या राजकीय आघाडीतून भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांना मंत्रिमंडळात न्याय दिल्याचे बोलल्या जात आहे.
एकूण 33 मंत्र्यांचा राजभवनात शपथविधी.
महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार रविवारी राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात राज्यपाल यांच्या राजभवनात संपन्न झाला,यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह एकूण 33 कैबिनेट मंत्र्यांनी पदाची शपथ घेतली.पहिल्यांदा विदर्भात सर्वाधिक मंत्रीपदे ही यवतमाळ जिल्ह्याला लाभली आहेत. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात यवतमाळ जिल्ह्याने हॅटट्रिक नोंदविली आहे.
संजय राठोड चौथ्यांदा कॅबिनेट मंत्री.
दिग्रस विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून संजय राठोड हे सलग पाचव्या वेळी निवडून आले असून ते आता पाचव्यांदा त्यांना कॅबिनेट मंत्री पद लाभले आहे. मागील महाविकास आलेले सरकार कॅबिनेट मंत्रीपदी असताना त्यांच्यावर लागलेल्या आरोपांमुळे संजय राठोड यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता, यानंतर 2024 च्या या निवडणुकीनंतर संजय राठोड हे जिल्ह्याच्या प्रगती पुस्तकात नापास असून त्यांना या सरकारात मंत्री पद मिळणार नाही, अशा राजकीय आणि माध्यम स्तरावर चर्चा होत असतानाच शिवसेनेचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा संजय राठोड यांच्यावर विश्वास दाखवून त्यांना थेट कॅबिनेट मध्ये सामील केले आहे. या मतदारसंघातून पाचव्यांदा विधानसभेत गेलेले संजय राठोड यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे.आता त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील हा एक मोठा टप्पा आहे. संजय राठोड पहिल्यांदा महसूल राज्यमंत्री झाले होते,त्यानंतर त्यांनी कॅबिनेटधमधील कारकिर्दीत वनमंत्री, अन्न व औषध प्रशासन मंत्री, आणि मृदा व जलसंधारण मंत्री आणि दोन वेळा यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री पद भूषविले आहे.
डॉ. अशोक उईके यांच्यावर पुन्हा विश्वास.
यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी बहुल असलेल्या राळेगाव मतदारसंघातून डॉ. अशोक उईके हे यंदा तिसऱ्यांदा विजयी झालेले आहे.यापूर्वी 2014 मध्ये युती सरकारमध्ये तीन महिने आदिवासी विकास मंत्री होते.2024 विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे प्रा. वसंत पूरके यांचा तिसऱ्यांदा पराभव करीत विधानसभेत पोहोचले आहेत. विशेष म्हणजे कॅबिनेट मंत्री झालेले डॉ. उईके यांचे संघ परिवार आणि भाजपमधील ज्येष्ठ नेत्यांसोबतघनिष्ट संबंध मानले जातात.यावेळीही मंत्रिमंडळात त्यांना संधी देवून भाजपने या आदिवासी भागाला आणि आदिवासी समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला असल्याची राजकीय चर्चा आहे.
नाईक घराण्याला पुन्हा मंत्रीपद इंद्रनील नाईक यांची राज्यमंत्री पदाची शपथ.
दुसरीकडे राज्यातील राजकारणात प्रसिद्ध असलेल्या आणि राज्याला दोन उपमुख्यमंत्री दिलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील पुसद मधील नाईक घराण्याला अनेक वर्षानंतर मंत्रीपद भेटले आहे. यापूर्वी यवतमाळ जिल्ह्यातून वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते. यानंतर इंद्रनील नाईक यांचे वडील मनोहरराव नाईक हे अनेक वर्षे राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री होते. या सरकार आता पुसद विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) चे युवा आमदार इंद्रनील नाईक यांनी मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.राज्याचे माजी मंत्री मनोहरराव नाईक यांचे ते चिरंजीव आहेत, तर राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांचे नातू असून पुसद विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. यवतमाळ जिल्ह्यात तीन मंत्री पद मिळाले असताना रविवारी राजभवन मंत्रिमंडळ विस्तार आणि शपथविधी होत असताना यवतमाळ जिल्ह्यातील या तीन विधानसभा मतदारसंघात फटाके फोडून आणि जल्लोष करीत आनंद साजरा करण्यात आला.