जाजू इंटरनॅशनल स्कूलमध्ये “मानवी मेंदू आणि रस्ता सुरक्षा मर्यादा” विषयावर कार्यशाळेचे आयोजन-यवतमाळ
यवतमाळ
जाजू इंटरनॅशनल स्कूलमध्ये दिनांक २७ जुलै २०२३ रोजी “मानवी मेंदू आणि रस्ता सुरक्षा मर्यादा” या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक मोटार वाहन आर.टी.ओ कार्यालय, यवतमाळचे सहाय्यक निरीक्षक माननीय दिव्येश उबाले हे होते. ते वाहतूक सुरक्षा समिती सभेनिमित्ताने शाळेत आले असता त्यांनी शिक्षकांनाही मार्गदर्शन केले.
सुरूवातीला त्यांनी अपघात, मृत्यूचे वाढते प्रमाण आणि लोकसंख्या विषयक माहिती दिली. त्यानंतर झोप न येणे, भीती, वेळेचे नियोजन, वैयक्तिक प्रश्न, आजारपण, कर्जाचे ओझे ही सर्व अपघात होण्याची कारणे सांगितली.
“तुमच्या भावनांचा तुमच्या गाडी चालवण्याच्या मार्गावर परिणाम होतो, याचा तुमच्या ड्रायव्हिंग वर ताण येऊ देऊ नका” हा मौलिक सल्लाही त्यांनी दिला. याशिवाय मानवी चुकांची चार कारणे – अनाकलनीय त्रुटी, अनाकलनीय चुकीचा निर्णय, अविवेकी अंधत्व, चुकीचा प्रतिसाद याविषयी मार्गदर्शन केले. जास्त खर्च करणे, धोकादायक ओव्हरटेकिंग, ताण आणि थकवा, औषधोपचार, मोबाइल वा इतर माध्यमांद्वारे लक्ष विचलीत होणे, ड्रग्ज आणि अल्कोहोलाचा अती वापर ही सर्व रस्ते अपघाताची कारणेही त्यांनी सांगितली. हेल्मेट घालून गाडी चालवावी, स्ट्रेस कमी ठेवावा, रस्त्याच्या उजव्या बाजूने पायी चालावे याविषयी मार्गदर्शक सूचना केल्या.
संस्थेचे अध्यक्ष माननीय प्रकाशजी जाजू सर, सचिव माननीय आशिषजी जाजू सर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.शिल्पा जाजू मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.शिल्पा जाजू मॅडम यांनी “शिक्षकांप्रमाणेच विद्यार्थ्यांमध्ये, पालकांमध्ये तसेच प्रत्येक व्यक्तीमध्ये वाहतुकीबाबत जाणीव जागृतता असणे गरजेचे आहे. यानंतर मी सुद्धा जवळ कुठेही जाताना सीट बेल्टचा वापर करणार व वाहतूक नियमांचे यथायोग्य पालन करणार…”असे आश्वासन दिले.
शाळेचे उपमुख्याध्यापक विजय देशपांडे सर, समन्वयक शिवाजी देशमुख सर, साबेरा बाटावाला मॅडम आणि समस्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत ही कार्यशाळा सुव्यवस्थित पार पडली.