Dengue Maharashtra: आणखी दोन विद्यार्थिनींचा डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू.

Dengue Maharashtra: आणखी दोन विद्यार्थिनींचा डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू.

पालकांनो वेळेत उपचाराची काळजी घ्या.

Dengue Maharashtra: मागील काही दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात डेंग्यूने थैमान मांडले आहे. बुधवारी आणखी दोन विद्यार्थिनींचा डेंग्यू सदृश आजाराने मृत्यू झाल्याचे पुढे आले असून पालकांनी मुलांच्या उपचारासाठी दक्षता घेण्याची गरज व्यक्त होत आहे. यवतमाळ तालुक्यातील वरुड येथे इयत्ता दहावीत शिकणाऱ्या ऋतिका किशोर उमरे (१५) रा. वरुड या विद्यार्थिनीचा मंगळवारी मृत्यू झाला.

ती वडगाव (पो.स्टे) येथील सुभाषचंद्र बोस विद्यालयात शिकत होती. ताप आल्याने ऋतिका हिला यवतमाळ येथे खासगी रुग्णालयात दाखल केले होते. प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने सावंगी मेघे येथील रुग्णालयात हलविले उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तिला डेंग्यू झाल्याचे सांगितले जात आहे. ऋतिका ही वरुड येथून सायकलने वडगाव येथे शिक्षणासाठी जात होती.

तिच्या अकस्मात मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे, तिच्यामागे आई, वडील भाऊ व मोठा आप्त परिवार आहे. वडगाव आणि अकोला बाजार प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात व्हायरल इन्फेक्शनचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. सरकारी आणि खासगी रुग्णालये फुल्ल झाले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा अपुरा साठा आहे. आरोग्य केंद्राकडून औषधी पुरवठ्याची मागणी करण्यात आली आहे. यापूर्वी पिंप्रीबुटी बोरीसिंह येथे डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण आढळून आले होते. दरम्यान, पालकांनी मुलांच्या आरोग्याकडे लक्ष देऊन वेळेत उपचारासाठी पुढाकाराची गरज आहे.

डेंग्यूसदृश आजाराने बालिका दगावली.

महागाव (कसबा): दारव्हा तालुक्यातील देऊरवाडी (लाड) येथील बालिका डेंग्यूसदृश आजाराने दगावली ही घटना मंगळवारी रात्री घडली. तनिष्का सुरेश नरे (१३) असे मृत बालिकेचे नाव आहे. तनिष्काला ताप आला होता. त्यामुळे तिच्यावर महागाव कसबा येथे एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र, ताप जास्त असल्यामुळे डॉक्टरांनी तिला यवतमाळ येथे घेऊन जाण्यास सांगितले.

मंगळवारी रात्री तिची प्रकृती जास्तच खालावली. तिला रात्रीच यवतमाळ येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात भरती केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले. तनिष्का सातवीमध्ये शिकत होती. तिच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

two × 5 =