Chandrapur Lok Sabha Election 2024: महाराष्ट्रातील चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ हा भारतीय राजकारणातील महत्त्वपूर्ण आणि प्रसिद्ध असलेला राजकीय शक्तीस्थान आहे. चंद्रपूर ची लोकसंख्या वैविध्यपूर्ण प्रतिबिंबित तयार करते आणि महाराष्ट्राचा एक महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून चंद्रपूरची ओळख आहे. या मतदारसंघात 2019 मध्ये 64.65% मतदान झाले.
आता 2024 मध्ये मतदार त्यांच्या मताची ताकद दाखवण्यासाठी आणखी उत्साही आहेत. प्रतिभा धानोरकर, शिवानी वडेट्टीवार या काँग्रेस पक्षातून लढत द्यायला तयार आहेत. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील 2024 च्या उमेदवारांच्या यादीनुसार भारतीय जनता पक्षाचे सुधीर मुगंटीवार हे प्रमुख उमेदवार आहेत. महाराष्ट्रातील पाच टप्प्यातील होणाऱ्या मतदानात पहिल्या टप्प्यातील मतदार संघ गडचिरोली, भंडारा-गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, रामटेक हे जिल्हे आहेत. एकूण मतदान 19 एप्रिल 2024 रोजी होणार असून मतमोजणी 4 जून 2024 रोजी होणार आहे.
चंद्रपूरची भौगोलिक पार्श्वभूमी.
11445 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेला, 15 तालुके असलेला एक महत्त्वाचा जिल्हा म्हणजेच चंद्रपूर. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात असलेले ताडोबा राष्ट्रीय उद्यान मगरीसाठी तसेच वाघांसाठी प्रसिद्ध आहे. 26 ऑगस्ट 1982 रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करण्यात येऊन चंद्रपूर व गडचिरोली हे दोन स्वतंत्र जिल्हे निर्माण झाले. चंद्रपूर येथे काच कारखाना तर बल्लारपूर येथे प्रसिद्ध कागद गिरणी आहे.
कोळसा व लाकूड बाजारासाठी तसेच संरक्षण साहित्याच्या कारखान्यासाठी चंद्रपूर प्रसिद्ध आहे. बाबा आमटे यांचे आनंदवन प्रकल्प चंद्रपुरातील आनंदवन येथे आहे. चंद्रपूर लोकसभेची एकूण सामाजिक आकडेवारी सांगायची तर या मतदारसंघात अनुसूचित जाती 13.9%, अनुसूचित जमाती 18.6%, मुस्लिम हे 5.8% तर बौद्ध समाज हा 11% असा 68% इतका आहे. ज्या प्रकारे भौगोलिक दृष्ट्या चंद्रपूर हा महत्त्वाचा भाग असला तरी राजकीय दृष्ट्या चंद्रपूर हा अधिक महत्त्वाचा आहे.
चंद्रपूर मतदारसंघाचा आजवरचा राहिलेला इतिहास.
– 1977 साली चंद्रपूर मतदारसंघासाठी पहिली लोकसभेची निवडणूक पार पडली होती. आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत भारतीय लोक दलाचे राजे विश्वेश्वरराव यांनी काँग्रेसच्या अब्दुल शफी यांचा 28,986 मतांनी पराभव केला होता. मात्र 1980 साली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेसने पुन्हा एकदा या मतदारसंघावर सत्ता स्थापन केली. कॉंग्रेसचे शांताराम पोटदुखे या मतदारसंघातून खासदार झाले. त्यांच्या नावाने चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचा गड म्हणून ओळखला जायचा.
– त्यांनतर सलग चौथ्यांदा खासदार झाल्यानंतर शांताराम पोटदुखे यांना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली. भारताचा महत्त्वपूर्ण एलपीजी सुधारणा झाला तेव्हा शांताराम पोटदुखे अर्थ खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री होते.
– 1996 साली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचा हंसराज अहीर यांनी शांताराम पोटदुखे यांचा पराभव केला.
– पण 1998 साली झालेल्या मध्यावधी निवडणुकीत अहिर यांचा काँग्रेसचे नरेशकुमार पुगलिया यांनी पराभव केला. 1999 मध्ये झालेल्या निवडणुकीत सुद्धा तेच पुन्हा खासदार झाले. पण 2004 मध्ये हंसराज अहीर यांनी आपल्या पराभवाचा वचपा काढला आणि नरेशकुमार यांचा 59,823 मतांनी पराभव केला होता.
– त्यानंतर पुढच्या 2009 आणि 2014 असे सलग वर्षात भाजपचे हंसराज अहिर खासदार राहिले.
– 2014 साली भाजपचे हंसराज अहीर, काँग्रेसचे संजय देवतळे आणि आपचे वामनराव चटप असा तिरंगी सामना चंद्रपुरात झाला. मोदींची असलेली हवा आणि या लोकसभा मतदारसंघात असणारा अहिर यांचा दांडगा जनसंपर्क याच्या आधारे ते तब्बल 2,35,886 मतांनी निवडून आले होते.
2019 चा टर्निंग पॉईंट.
चंद्रपूर लोकसभेचा इतिहास आपण पाहिला तर मागच्या दोन दशकात इथे भाजपचं वर्चस्व राहिले आहे. मात्र 2019 ला ही जागा कॉंग्रेसने आपल्याकडे खेचून आणली. काँग्रेसमध्ये आलेल्या बाळू धानोरकर यांना चंद्रपूर लोकसभेचं तिकीट मिळालं आणि त्यांनी ही जागा जिंकून 2019 ला महाराष्ट्रात निवडून येणारे कॉंग्रेसचे एकमेव खासदार ठरले.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे बाळूभाऊ उर्फ सुरेश नारायण धानोरकर वर्सेस हंसराज अहिर यांच्यात लढत बघायला मिळाली होती. त्यात बाळू भाऊ धानोरकर यांनी 5,57,550 मते मिळवून विजयी झाले होते, तर भाजप पक्षाचे हंसराज अहिर यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. दोघातील विजयाचे अंतर 44,822 मतांचे होते. पण त्यांच्या अकाली निधनानं सध्या ही जागा रिक्त झाली. इथे पोटनिवडणूक झाली नाही. आता 2024 या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी कोणाची असणार याकडे लक्ष लागले आहे.
भाजप कडून सुधीर मुनगंटीवार यांची उमेदवारी जाहीर.
चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभा निवडणुकीची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. सुधीर मुनगंटीवार यांचे नाव जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांनी चंद्रपुरातील गांधी चौकात फटाक्यांची आतिषबाजी केली होती आणि जल्लोष साजरा केला होता.
त्यावेळी मुनगंटीवार म्हणाले, “पक्षाचा आदेश आहे म्हणून लोकसभा, अन्यथा विधानसभेत राहणे यासाठी आवडेल की या प्रवासामध्ये परिचित व्यक्ती, परिचित अधिकारी, सर्वपक्षीय राजकीय नेत्यांशी असणारे संबंध आणि यातून आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी योगदान देण्याची शक्यता यातून निर्माण होते कारण चंद्रपूर हा माझा मतदारसंघ राहिला आहे.”
तर 2024 च्या निवडणुकीचे काँग्रेसचे तिकीट कोणाला?
आपल्या सर्वांनाच माहिती आहे की चंद्रपूर ही कॉंग्रेसच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आणि हाय प्रोफाइल सीट आहे. चंद्रपूरमध्ये एकीकडे शिवानी वडेट्टीवार, तर दुसरीकडे प्रतिभा धानोरकर दोघींचाही जोरदार प्रयत्न सुरु आहेत. हायकमांड पर्यंत प्रतिभा धानोरकर यांचा जाण्याचा विचार आहे. बाळू धानोरकर यांच्या जागी आपल्याला लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी प्रतिभा धानोरकर प्रयत्नशील आहेत.
दुसरीकडे विजय वडेट्टीवार आणि शिवानी वडेट्टीवार या दोघांनीही आम्ही लोकसभा निवडणूक लढू शकतो, असे ठाम मत मांडले आहे. एका अर्थाने चंद्रपूरसाठी कॉंग्रेसमध्ये मोठी रस्सीखेच सुरू झाली आहे. हायकमांडने आपले अजूनपर्यंत निर्णय दिलेले नाही आणि साहजिकच त्यामुळे कॉंग्रेसचे कार्यकर्ते त्यांच्यामध्ये एक मोठी चलबिचल सुरु आहे.
त्यातच सुधीर मुनगंटीवार यांसारख्या अतिशय दिग्गज नेता मैदानात उतरले आणि त्यांनी एक प्रकारे आपला प्रचार देखील सुरु केला आहे. चंद्रपुरात उमेदवारीचा संघर्ष कायम असताना सुधीर मुनगंटीवार, वडेट्टीवार फॅमिली आणि प्रतिभा धानोरकर यांची प्रचाराची जोरदार तयारी सुरू झालेली आहे. काँग्रेसमधील एका उमेदवारास तिकीट मिळाल्यानंतर लोकसभा निवडणुकीचा चुरशीचा खेळ बघण्यासाठी चंद्रपुरातील जनता आतुरलेली आहे.