Zila Parishad School: जिल्ह्यात ६६ केंद्रप्रमुख तर मुख्याध्यापकांची ५५ पदे रिक्त.

Zila Parishad School: जिल्ह्यात ६६ केंद्रप्रमुख तर मुख्याध्यापकांची ५५ पदे रिक्त.

पदे भरायला अडचण काय?: शालेय शिक्षणावर परिणाम.

मूल: शालेय प्रशासन व्यवस्थित चालावे, यासाठी शासनाने जिल्हा परिषद शाळेत (Zila Parishad School) उच्च श्रेणी मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांचे पद निर्माण केले; मात्र जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत ६६ केंद्रप्रमुख व ५५ उच्च श्रेणी मुख्याध्यापकाची पदे रिक्त असल्याने मुख्याध्यापकाविना शाळा चालत आहेत. तसेच केंद्रप्रमुखाचा पदभार विषय शिक्षकाकडे दिला गेला आहे.

त्यामुळे शैक्षणिक अध्यापनात अडचणी निर्माण होत आहेत. ही रिक्त पदे भरण्यात यावीत, अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा शाखा चंद्रपूरच्या वतीने करण्यात आली आहे. अनेकवेळा समितीने याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन पदे भरली जाणार असल्याचे आश्वासन मिळाल्याने अनेक शाळांना दिलासा मिळणार आहे.

जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत उच्च श्रेणी मुख्याध्यापक यांची ५५ पदे व त्यांना सहकार्य करणाऱ्या केंद्रप्रमुखांची ६६ पदे रिक्त असल्याने त्यांचा भार शिक्षक व विषय शिक्षक यांच्याकडे दिला आहे. त्यामुळे त्या शिक्षकावर अतिरिक्त भार पडला आहे. प्रभार दिलेल्या शिक्षकांचे असलेले वर्ग कोण सांभाळणार असा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविकच आहे.

त्यामुळे महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा शाखा चंद्रपूरच्या वतीने जून महिन्यात शिक्षणाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन सदर पदे पदोन्नतीने भरण्याबाबत विनंती केली होती. १० जुलैपर्यंत या पदांवर पदोन्नती करण्यात येईल असे आश्वासन त्यावेळी संघटनेला देण्यात आले होते. तीन महिन्यांचा कालावधी उलटूनही सदर मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांची पदे भरली नाहीत.

त्यामुळे २० ऑक्टोबरला संघटनेच्या जिल्हास्तरीय समितीने जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे यांना तिसरे स्मरणपत्र दिले व या संदर्भात चर्चा केली. यावेळी शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी लवकर सर्व संघटनांची सभा लावावी, अशी विनंती करण्यात आली.

पुढील १५ दिवसांत पदोन्नतीने पदे भरणार.

पुढील १५ दिवसांत पदोन्नती प्रकरणे निकाली काढण्यात येईल, तसेच पटसंख्येनुसार शिक्षकांचे समायोजन करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी संघटनेला देण्यात आले. या शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष किशोर आनंदवार, सरचिटणीस सुरेश गिलोरकर, महिला मंच जिल्हाध्यक्ष शालिनी खटी, उपाध्यक्ष शुभाष अडवे, जीवन भोयर व राज्य नेते विजय भोगेकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

15 − eight =