घाटंजी : काही दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात थंडीचा तडाखा वाढत आहे. अशातच घाटंजी येथे वाघाडी नदीवर एक 62 वर्षीय वृद्ध सकाळी आंघोळीस गेला. सकाळी सकाळी थंड पाण्याचा अंदाज न आल्याने या वृद्धाचे शरीर थंडीने गारठले.अशातच हा वृद्ध आपली शुद्ध हरपून बसला. त्याचे शरीर हे पाण्यावर तरंगून राहिले होते.
अशातच काही जागरूक नागरिकांनी वृद्धाचा मृतदेह हा नदीच्या पाण्यावर तरंगत असल्याचा फोन घाटंजी पोलिसांना केला. प्रसंगाचे गांभीर्य ओळखत ठाणेदार निलेश सुरडकर हे यांनी घटनास्थळी धाव घेतली. नदीपात्रातून या वृद्धास बाहेर काढल्यावर पोलिसांनी त्याची नाडी तपासली असताना हा वृद्ध जिवंत असल्याची खात्री त्यांना पटली. तातडीने या वृद्धास ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. सध्या या वृद्धाची प्रकृती स्थिर आहे.
संभाषिव वहिले असं या वृद्धाचे नाव आहे. थंड पाण्यामुळे या वृद्धास Vasovagal attack आला असल्याचे समजते. या अटॅकमध्ये शरीराच्या नसा मोठ्या होतात. यामुळे हृदयाचे ठोके कमी होतात आणि मेंदूकडे रक्त पुरवठा कमी होतो. अशातच व्यक्ती आपली शुद्ध गमावून बसतो.
एकंदरीतच जागरूक नागरिकांनी वेळेवर पोलिसांना फोन करणे, पोलिसांनी तत्परतेने येऊन नदीपात्रातून या वृद्धास बाहेर काढणे आणि त्याला वेळेवर योग्य तो औषधोपचार मिळाल्याने या वृद्धाचे प्राण वाचणे या सगळ्यामुळे ‘देव तारी, त्याला कोण मारी ‘ या उक्तीचा प्रत्यय आला. पोलिसांनी जी तत्परता दाखवून या वृद्धांचे प्राण वाचविल्याने त्यामुळे जनतेत पोलिसांचे कौतुक होत आहे.