Yashomati Thakur: ९४५ कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी अडीच कोटींचा निधी त्वरीत द्या.

Yashomati Thakur: ९४५ कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी अडीच कोटींचा निधी त्वरीत द्या.

Yashomati Thakur: मदत व पुनर्वसन मंत्र्यांना साकडे.

अमरावती: तालुक्यातील देवरा, देवरी, रेवसा व पुसदा येथील दर्जेदार पुनर्वसनाकरिता अडीच कोटींचा निधी व रोहणखेडा, पर्वतापूर, दोनद व तिवसा तालुक्यातील धारवाडा, दुर्गवाडा येथील ९४५ कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी आमदार अॅड. यशोमती ठाकूर यांनी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्याकडे केली.

सन २००७ मधील महापुरामुळे अमरावती तालुक्यातील देवरा, देवरी, रेवसा व पुसदा येथील पुनर्वसनाकरिता मिळालेला निधी अपुरा असल्याने अनेक मूलभूत सुविधांची कामे रखडली आहेत तसेच पेढी बॅरेज उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत रोहणखेड-पर्वतापूर व दोनद येथील ८५७ कुटुंबांचे व तिवसा तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्पांतर्गत धारवाडा-दुर्गवाडा येथील ३५८ कुटुंबांचे अद्याप पुनर्वसन झाले नाही.

त्यामुळे या नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असल्याचा मुद्दा आ. ठाकूर यांनी ना. पाटील यांना भेटून मांडला. तिवसा मतदारसंघातील रखडलेल्या पुनर्वसन व मूलभूत सुविधांची कामे पूर्ण झाली नाहीत, त्यामुळे पुनर्वसनग्रस्तांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असल्याची कैफियत मांडली. अमरावती तालुक्यातील देवरा, देवरी, रेवसा व पुसदा येथे सन २००७ मध्ये आलेल्या महापुरामुळे प्रचंड नुकसान झाले होते.

त्यांना न्याय मिळावा, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे २.८० कोटीची प्रशासकीय मान्यता मिळाली. त्यापैकी केवळ ३७.१४ लाख निधीच प्रत्यक्ष प्राप्त झाला असून, उर्वरित २ कोटी ४६ लाख ५१ हजार रुपये निधी अप्राप्त आहे. त्यामुळे येथील नागरी सुविधा दर्जेदार पुनर्वसनाची कामे निधीअभावी रखडलेली असल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली.

त्याचप्रमाणे पेढी बॅरेज उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत दर्जेदार पुनर्वसनांतर्गत रोहणखेडा पर्वतापूर, दोनद येथील ५८७ पुनर्वसित कुटुंबांचे अद्याप पुनर्वसन झालेले नाही. त्यामुळे या नागरिकांची पुनर्वसनासाठी अजूनही पायपीट सुरू आहे. तसेच तिवसा तालुक्यातील निम्ना वर्धा प्रकल्पांतर्गत धारवाडा, दुर्गवाडा येथील ३५८ कुटुंबांचे अद्याप पुनर्वसन झाले नाही.

त्यामुळे या कुटुंबांचीसुद्धा प्रचंड फरफट सुरू आहे. या सर्व बाबींचा विचार करून पुनर्वसनाच्या या कामांसाठी निधी व त्या कुटुंबांचे तातडीने पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी आमदार अॅड. यशोमती ठाकूर यांनी पत्रातून केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

four + nine =