Unseasonal Rain in Maharashtra : राज्यात पुढील पाच दिवस अवकाळी पावसाचे संकट घोंघावत आहे. अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणात बाष्पयुक्त हवा येत असल्याने आणि गुजरातच्या समुद्रात वाऱ्यांची चक्रीय स्थिती निर्माण झाल्याने महाराष्ट्राच्या वातावरणात मोठा बदल झाला आहे.
अनेक शहरांचे तापमान ४० अंशांच्या वर पोहोचले असतानाच, हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा दिला आहे. यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.
प्रादेशिक हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. या भागांमध्ये दुपारनंतर किंवा सायंकाळच्या वेळी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईतील किमान तापमान २६ अंश सेल्सियस आणि कमाल तापमान ३३ अंश सेल्सियसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने राज्यातील तब्बल १५ जिल्ह्यांसाठी पावसाचा ‘यलो’ अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये ठाणे, जळगाव, नाशिक, पुणे, सातारा, पालघर, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ, बीड, अमरावती आणि भंडारा यांचा समावेश आहे.
यासोबतच, गडचिरोली आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज’ अलर्ट जारी करण्यात आला आहे, जिथे अधिक तीव्र स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. बुलढाणा, अकोला आणि वाशिम वगळता उर्वरित महाराष्ट्रातही हलका पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सोमवारपासून पुढील तीन दिवस राज्यात पावसाची ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.
Unseasonal Rain in Maharashtra
या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. वातावरणातील या बदलांमुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो, त्यामुळे सर्वांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.
बुधवार आणि गुरुवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांमध्ये गारपीट होण्याची दाट शक्यता आहे. उष्ण आणि दमट वाऱ्यांच्या एकत्रित येण्यामुळे कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्रात पुढील पाच दिवस अवकाळी पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
विशेषतः विदर्भात यावर्षी अवकाळी पावसाचे वारंवार संकट येत आहे. आता पुन्हा नागपूर, अमरावती, वर्धा, यवतमाळ, अकोला आणि गोंदिया या भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह पाऊस पडणार आहे.
विदर्भातील सर्व जिल्ह्यांचे तापमान सध्या ४० अंशांच्या वर असले तरी, अवकाळी पावसामुळे तापमानात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. या भागातील कमाल तापमान ३८ ते ४१ अंश सेल्सियसच्या दरम्यान राहू शकते.
पुणे जिल्ह्यालाही हवामान विभागाने ‘यलो’ अलर्ट जारी केला आहे. पुणे शहरात पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण राहील आणि त्यानंतर मंगळवारपासून पुढील चार दिवस मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
पुण्यातील कमाल तापमानात सरासरी दोन अंश सेल्सियसने घट झाली आहे, तर किमान तापमानात तीन अंश सेल्सियसने वाढ झाली आहे.
दरम्यान, वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील काही गावांना रविवारी अवकाळी पावसासोबत गारपिटीचा जोरदार तडाखा बसला. या गारपिटीमुळे पपई, केळी आणि इतर फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
तसेच तीळ, उन्हाळी पिके आणि भाजीपाला पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. पवनार, सुरगाव, कान्हापूर आणि रेहकी या गावांमध्ये गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.