TOD Meter : महावितरणकडून बसवण्यात येणाऱ्या टीओडी (टाइम ऑफ डे) मीटरमुळे आता वीज ग्राहकांना त्यांच्या वीज वापराची माहिती दर तासाला म्हणजेच ‘रिअल टाइम’मध्ये मिळणार आहे. यामुळे ग्राहक आपल्या वीज वापरावर नियंत्रण ठेवू शकतील, ज्याचा थेट परिणाम वीज बिलावर होणार आहे. यासोबतच अचूक आणि वेळेत वीज बिल मिळण्यास मदत होणार आहे.
टीओडी मीटर हे पोस्टपेड पद्धतीचे असून, मीटर रीडिंगच्या आधारावरच वीज बिल आकारले जाणार आहे. या मीटरची बसवणूक ग्राहकांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता करण्यात येत असून, ते पूर्णपणे ग्राहकांच्या फायद्याचे आहे. त्यामुळे या मीटरविषयी पसरवल्या जाणाऱ्या गैरसमजांवर विश्वास न ठेवता, ग्राहकांनी महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सध्या नव्या वीज जोडणीसाठी देखील हेच मीटर वापरण्यात येत आहेत.
महावितरणने स्पष्ट केले आहे की, टीओडी मीटरचा वापर केल्यामुळे वीज चोरीवर अंकुश ठेवता येणार आहे आणि त्यामुळे विभागाच्या महसूलात वाढ होईल. हीच वाढीव रक्कम या मीटरच्या खर्चासाठी वापरण्यात येणार आहे. त्यामुळे टीओडी मीटरविषयीचा विरोध निराधार असून, ग्राहकांनी यासाठी सकारात्मक भूमिका घ्यावी.
नवीन टीओडी मीटर द्वारे ग्राहकांना दर तासाचा वीज वापर त्यांच्या मोबाईलवर पाहता येणार आहे. त्यामुळे वीज वापर आणि बिलामध्ये कोणताही फरक असेल, तर ग्राहकास लगेचच याची कल्पना येईल. या मीटरना राष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त प्रयोगशाळांमध्ये चाचणी देण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना एक पारदर्शक, आधुनिक आणि विश्वासार्ह सेवा मिळणार आहे.
तसेच महावितरणने वीज नियामक आयोगाकडे प्रस्ताव पाठवला असून, दिवसा स्वस्त दरात उपलब्ध होणाऱ्या वीजेचा फायदा घरगुती ग्राहकांनाही मिळावा यासाठी दुपारी वीजदरात सवलत देण्याचा विचार सुरू आहे. सध्या टीओडी सुविधा असलेल्या मीटरमुळे हा लाभ मिळू शकतो, मात्र जुन्या मीटरमुळे ही सवलत घेता येणार नाही. त्यामुळे नवीन टीओडी मीटर ही सुविधा ग्राहकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.