शेतकऱ्याने केला बँक व्यवस्थापकावर प्राणघातक हल्ला.
Buldhana : शेतकरी बचत गटाचे पैसे काढण्यासाठी आलेल्या संस्थेच्या सचिवासोबत झालेल्या शाब्दिक वादातून पंजाब नॅशनल बँकेच्या व्यवस्थापकास धारधार चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना येथील टॉवर चौकाजवळील पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत घडली. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. बँकेच्या व्यवस्थापकाला उपचारार्थ खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
खामगाव तालुक्यातील जळका भडंग येथील संत गजानन शेतकरी स्वयंसहायता बचत गटाचे सचिव किरण गायगोळ हे नांदुरा रोडवरील पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत आले. संस्थेच्या बचतगट खात्यातून शेतकऱ्यांना द्यावयाचे पैसे काढण्यासाठी त्यांनी व्यवस्थापकाची भेट घेतली. दरम्यान, बँकेचे व्यवस्थापक शंतनू राऊत यांनी पैसे काढण्यासाठी संस्थेच्या प्रोसेडिंग बुकची खरी प्रत आणण्यासाठी सांगितले होते. मात्र, आरोपी किरण गायगोळ यांनी मागच्या वेळेस प्रोसिडिंग बुकच्या झेरॉक्स कॉपीवरच पैसे दिल्याचे म्हटले.
मात्र, व्यवस्थापकांनी खरी प्रोसेडिंग बुक नक्कलशिवाय पैसे मिळणार नाही, असे सांगितल्याने त्यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाला. अचानक आरोपी किरण गायगोळ याने त्याच्यासोबत आणलेला चाकू खिशातून काढून बँक व्यवस्थापक राऊत यांच्यावर चाकूने वार केल्याने व्यवस्थापक राऊत रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. तातडीने बँकेतील कर्मचाऱ्यांनी त्यांना उपचारार्थ शहरातील खाजगी रूग्णालयात दाखल केले.
घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी किरण गायगोळ याच्या विरुद्ध शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक केली आहे. तर वापरलेला चाकूही जप्त केला. घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून, बँक आणि बँकेच्या परिसरात धावपळ उडाली होती.