Robbery Case: दिवाळी सणानिमित्त घराला कुलुप लाऊन कुटुंब बाहेरगावी गेलेले असतांना घराचे कुलुप तोडून कपाटातील पर्समध्ये ठेवलेला सोन्याच्या 7 ग्रॅम दागिन्यांसह नगदी 18 हजार रुपये असा एकुण 48 हजाराचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. सदर चोरीची घटना दि 12 नोव्हेंबर च्या मध्यरात्री रात्री 1 ते 5 वाजताच्या दरम्यान स्थानिक पाटीलनगर येथे घडली आहे.
पाटील नगर येथील रहिवाशी असलेले फिर्यादी विश्वजित मधुकर मानकर हे दिवाळी सणानिमित्त घराला कुलुप लाऊन आपल्या कुटुंबासह आर्णी येथे आपल्या कुटुंबासह गेलेले असतांना दि. 12 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री 1 ते 5 वाजताचे दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलुप तोडून घरातील सामान अस्ताव्यस्त केले व कपाट फोडून त्यातील 5 ग्रॅम व अडीच ग्रॅम सोन्याच्या अंगठ्या व नगदी 18 हजार रुपये असा एकुण 48 हजाराचा ऐवज लंपास केला.
फिर्यादी व त्यांचे कुटुंब आर्णि येथे असतांना त्यांना त्यांच्या पत्नीची मोठी बहीण रेखा घाळवट यांनी त्यांना तुमच्या घराचे कुलुप तुटलेले दिसत असून घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसत आहे तुम्ही ताबडतोब या असे कळविताच फिर्यादी विश्वजित यांनी येऊन घराची पाहणी केली व पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिल्या वरून पोलीसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे ठाणेदार शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार गजानन राठोड हे करीत आहे.