प्रियदर्शनी सहकारी सूतगिरणी कर्जमुक्त हा आनंदाचा सर्वोच्च क्षण.

प्रियदर्शनी सहकारी सूतगिरणी कर्जमुक्त हा आनंदाचा सर्वोच्च क्षण.

डॉ. विजय दर्डा यांचे प्रतिपादन : ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात.

प्रियदर्शनी सहकारी सूतगिरणी : सहा वर्षांपूर्वी बंद पडलेली सूतगिरणी पुन्हा सुरू व्हावी, यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. राज्य शासनाचीही साथ मिळाली. राज्यातील एकमेव सहकारी सूतगिरणी भाडेतत्त्वावर देण्यास त्यांनी मंजुरी दिली. आज शेतकरी-कष्टकऱ्यांची ही गिरणी पूर्णपणे कर्जमुक्त झाली असून, हा आयुष्यातील सर्वोच्च क्षण असल्याचे प्रतिपादन प्रियदर्शनी सहकारी सूतगिरणीचे अध्यक्ष डॉ. विजय दर्डा यांनी केले.

ते कारखानास्थळी झालेल्या ३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते. मंचावर राज्याचे माजी उद्योगमंत्री राजेंद्र दर्डा, गिरणीचे उपाध्यक्ष कीर्ती गांधी ‘सत्यम “स्पिनर्स चे सरव्यवस्थापक अभिजित सेन यांच्यासह संचालक माणिकराव भोयर, किशोर दर्डा, बाळासाहेब मांगुळकर, राजीव निलावार, कैलास सुलभेवार, प्रकाश छाजेड, जयानंद खडसे, संजय पांडे, डॉ. प्रताप तारक आदींची होती.

उपस्थिती शेतकरी कष्टकऱ्यांची ही संस्था पुन्हा सुरू व्हावी, असा निर्धार केला होता. अनेक प्रसंगावर मात करीत आम्ही ती सुरू करण्यात यशस्वी ठरलो. शासनानेही यासाठी प्रायोगिक तत्त्वावर गिरणी भाडेतत्त्वावर देण्याच्या प्रस्तावास मंजुरी देऊन क्रांतिकारक निर्णय घेतल्याचे डॉ. दर्डा यावेळी म्हणाले. गिरणी पुन्हा सुरू करण्यासाठी माजी उद्योगमंत्री राजेंद्र दर्डा, तत्कालीन वस्त्रोद्योगमंत्री असलम शेख, वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील.

वस्त्रोद्योग विभागाचे सचिव पराग जैन, वस्त्रोद्योग विभागाच्या आयुक्त शीतल उगले, महाराष्ट्र स्पिनिंग मिल फेडरेशनचे अध्यक्ष अशोक स्वामी, कार्यकारी संचालक देसाई आदींनी मोलाचे सहकार्य केल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. सत्यम स्पिनर्स’चे संचालक भूपिंदरसिंग राजपाल, चेतन अग्रवाल यांचेही त्यांनी आभार मानले. त्यांनी गिरणी चालविण्यास घेऊन या परिसराचा कायापालट करण्यात योगदान दिले.

गिरणीच्या माध्यमातून या भागातील अनेक तरुणांच्या हातांना रोजगार मिळाला आहे. कारखान्याचे सभासद असलेल्या सहा हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी संयम आणि सहकार्याची भूमिका घेतल्यानेच हे शक्य झाल्याचेही डॉ. दर्डा यांनी सांगितले. प्रारंभी कीर्ती गांधी यांनी प्रास्ताविक तसेच मागील वर्षीच्या अहवालाचे वाचन केले.

मागासलेल्या जिल्ह्यात शेतकऱ्यांची सूतगिरणी उभी राहावी त्यांच्या मुलांना तेथे रोजगार मिळावा, हे स्वप्न ज्येष्ठ स्वातंत्रसंग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उर्फ बाबूजी यांनी पाहिले होते. आज ते पूर्णत्वास आल्याचा आनंद आहे. आज गिरणीचे २८ हजार ७०० चाते पूर्ण क्षमतेने सुरू असल्याचे सांगत शेतकरी सभासदांनी दाखविलेल्या विश्वासामुळे हे शक्य झाल्याचे ते म्हणाले, सहकार विभागातील निवृत्त अधिकारी कवडू नगराळे यांनीही मनोगत व्यक्त केले.

सहकारी सूतगिरणी भाडेतत्त्वावर चालवून या गिरणीने इतिहासात आपली नोंद केल्याचे ते म्हणाले. पारदर्शक कारभार आणि प्रामाणिक कुशल नेतृत्व असल्यास सहकारी संस्था बंद होत नाही, याचा धडाच या गिरणीने कृतीतून घालून दिल्याचे ते म्हणाले. सभेला सभासदांची उपस्थिती होती.

सरकारने शेतकऱ्यांच्या कापसाला वाढीव दर द्यावा.

दोन वर्षांपूर्वी कापसाचे भाव प्रतिक्विटल १२ हजार रुपयांपर्यंत होते. मागील वर्षी हा भाव नऊ हजारांवर घसरला. यंदा प्रतिक्विंटल सात हजार भाव मिळत आहे. शेतकन्यांना येणारा प्रतिहेक्टरी खर्च पाहता कापसाला वाढीव दर देण्याची गरज आहे. खरे तर सूतगिरणीचा अध्यक्ष असताना अशी मागणी करणे माझ्यासाठी नुकसानदायी आहे.

मात्र, ही सूतगिरणी शेतकरी, कष्टकरी सभासदांची आहे. त्यांच्या हितासाठी शासनाने कापसाला भाववाढ द्यायला हवी, अशी मागणी सरकारकडे करीत असल्याचे डॉ. विजय दर्डा यांनी सांगितले. दर्डा यांच्या याच वक्तव्याचा धागा पकडत सूतगिरणीचे अध्यक्ष कापसाचे भाव वाढवून द्या, असे म्हणतात. कारण, त्यामागे सामाजिक न्यायाची भूमिका असल्याचे कवडू नगराळे आपल्या भाषणात म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

seventeen − two =