Petrol Diesel Prices : जगभरात कच्च्या तेलाच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरण होत आहे. सध्या ब्रेंट क्रूडचे दर ६१ डॉलरच्या जवळ पोहोचले आहेत. ब्लूमबर्गच्या माहितीनुसार, जुलै २०२५साठी ब्रेंट क्रूड फ्युचर्स ०.६१% नी कमी होऊन प्रति बॅरल ६०.६९ डॉलरवर आले आहेत, तर यूएस वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट क्रूड जून २०२५साठी ५७.७३ डॉलर प्रति बॅरलवर आहे.
या घसरणीचे मुख्य कारण म्हणजे अमेरिका आणि सौदी अरेबियामधील घडामोडी. अमेरिकेची अर्थव्यवस्था अपेक्षेपेक्षा कमजोर भासल्याने आणि सौदी अरेबिया तेल पुरवठा वाढवण्याच्या तयारीत असल्याने बाजारात मोठी घसरण झाली आहे.
त्यामुळे लवकरच पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ दरात कपात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.कच्च्या तेलाचे दर आणखी घसरण्याची शक्यता वर्तवली जात असून, मागणीतील घट आणि पुरवठ्यातील वाढ लक्षात घेता ब्रेंट क्रूड ५५ डॉलर प्रति बॅरलपर्यंत खाली जाऊ शकतो, असं वेल्थस्ट्रीट रिसर्च फर्मच्या सुगंधा सचदेवा यांनी सांगितलं आहे.
तेल कंपन्या करतात नफा, पण दरात कपात नाही! | Petrol Diesel Prices
गेल्या वर्षी मार्चमध्ये कच्चं तेल ८४.४९ डॉलर प्रति बॅरल असताना केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात २ रुपयांची कपात केली होती. सध्या तेल कंपन्या प्रति लिटर १० ते १२ रुपयांचा नफा कमावत आहेत, तरीही आंतरराष्ट्रीय दर घसरलेले असतानाही दरात कपात झालेली नाही.
८ एप्रिलला आयओसीने पेट्रोलची बेस प्राईज ५४.८४ रुपयांवरून ५२.८४ रुपये केली होती. मात्र सरकारने उत्पादन शुल्क वाढवून त्या कपातीचा फायदा घेतला. दिल्लीत सध्या पेट्रोल ९४.७७ रुपये आणि डिझेल ८७.६७ रुपये प्रति लिटर आहे.
अमेरिकेच्या साठ्यात घट, सौदीची वेगळी रणनीती.
अमेरिकेच्या ऊर्जा विभागाच्या माहितीनुसार, कच्च्या तेलाचा साठा २७ लाख बॅरलने कमी झाला आहे. ही आकडेवारी विश्लेषकांच्या अपेक्षेपेक्षा वेगळी होती. सौदी अरेबिया सध्या कमी दर स्वीकारण्यास तयार असल्याची माहिती मिळाली आहे. ५ मे रोजी होणाऱ्या ओपेक बैठकीत काही देश उत्पादन वाढवण्याची शिफारस करू शकतात.
जागतिक स्तरावर घसरते दर असेच टिकून राहिल्यास लवकरच भारतीय नागरिकांना इंधन दरात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.