No Digital Payments on Petrol Pumps : गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रासह संपूर्ण देशात डिजीटल व्यवहार आणि यूपीआय पेमेंटचा वापर झपाट्याने वाढला आहे. अगदी ५ ते १० रुपयांसाठीही लोक मोबाईल अॅप्सद्वारे पैसे देत आहेत.
त्यामुळे बहुतांश नागरिकांनी आता रोख रक्कम बाळगणे जवळपास थांबवले आहे. रेस्टॉरंट, भाजी मंडई, किराणा दुकानांपासून ते पेट्रोल पंपांपर्यंत सर्वत्र डिजीटल व्यवहार सर्रासपणे होत आहेत. अशा वेळी विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने एक मोठा निर्णय घेतला आहे.
विदर्भातील विशेषतः नागपूर जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवर १० मे, शनिवारपासून कोणत्याही स्वरूपाचे डिजीटल पेमेंट स्वीकारले जाणार नाही, अशी घोषणा करण्यात आली आहे. सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे असोसिएशनने स्पष्ट केले आहे.
अलीकडच्या काळात अनेक पेट्रोल पंप चालकांच्या बँक खात्यांवर सायबर गुन्ह्यांमुळे कारवाई झाली आहे. संशयास्पद किंवा फसवणूक झालेल्या व्यवहारांमुळे संबंधित खात्यांतील लाखो रुपयांची रक्कम थेट गोठवण्यात आली आहे. काही प्रकरणांमध्ये संपूर्ण बँक खातेच गोठवण्यात आले आहे.
ही रक्कम परत मिळवण्यासाठी गृह मंत्रालयाच्या परवानगीची आवश्यकता असते. या प्रक्रियेत वेळ लागतो, तसेच अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. इतकेच नाही, तर सायबर क्राइम विभागाकडे तक्रार नोंदवूनही अद्याप काहीही ठोस उत्तर किंवा तोडगा समोर आलेला नाही.
देशात डिजीटल व्यवहाराचे प्रमाण वाढत असतानाच, त्याचा गैरफायदा सायबर गुन्हेगार घेत आहेत. बनावट व्यवहारांच्या माध्यमातून पंप चालकांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे विदर्भातील पेट्रोलपंप चालकांनी एकत्र येत हा ठोस पाऊल उचलले आहे.
विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने स्पष्ट केले आहे की, ग्राहकांच्या सुरक्षेपेक्षा पंप चालकांचे आर्थिक नुकसान आणि बँक खात्यांवरील निर्बंध यामुळे त्यांनी ही भूमिका घेतली आहे. त्यामुळे शनिवारपासून या भागातील ग्राहकांनी पेट्रोल पंपावर जाताना रोख रक्कम घेऊनच जावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. सध्याच्या घडीला हा निर्णय तात्पुरता असला, तरी यावर कायमस्वरूपी उपाय यंत्रणा न मिळाल्यास, हे धोरण पुढेही कायम राहू शकते.