Nagpur Pune Vande Bharat Express : नागपूर-पुणे-नागपूर या मार्गावर वर्षभर प्रचंड गर्दी असल्याने, मिळेल ते तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी पुढे येत आहे. लवकरच या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होणार असल्याचे संकेत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिले आहेत.
अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, पुणे-नागपूर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
दररोज हजारोंच्या संख्येने नागपूर-पुणे दरम्यान रेल्वेने प्रवास करणारे प्रवासी, १४ ते १६ तासांचा प्रवास रेल्वेनेच करणे पसंत करतात. त्यामुळे वर्षभर या मार्गावर तिकीटांची कमतरता भासते. प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळणे कठीण जाते आणि अनेक जण मिळेल त्या तिकीटावर प्रवास करतात. काही जण मग पर्याय म्हणून खासगी बससेवा निवडतात, मात्र बसप्रवास खूप लांब व त्रासदायक असल्याने त्याचा अनुभव नेहमीच समाधानकारक नसतो.
या पार्श्वभूमीवर, गेल्या दोन वर्षांपासून वंदे भारत एक्स्प्रेस चालविण्याची मागणी सातत्याने होत होती. प्रवासी संघटना व लोकप्रतिनिधींनी देखील वेळोवेळी निवेदने दिली होती. मात्र, निर्णय हा रेल्वे मंत्रालयाकडे असल्याने स्थानिक अधिकाऱ्यांच्या हातात फारसे काही नव्हते.
आता स्वतः केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यात झालेल्या चर्चेमुळे ही सेवा सुरू होण्याच्या हालचालींना वेग आला आहे. यापूर्वी नागपूरहून जबलपूर, इंदोर आणि सिकंदराबादसाठी वंदे भारत सेवा सुरू झाली आहे. नागपूर-पुणे वंदे भारत ही चौथी सेवा ठरणार आहे.
नागपूर-सिकंदराबाद वंदे भारतला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. मात्र नागपूर-पुणे मार्गावरील प्रवाशांची संख्या पाहता, ही नवी सेवा पूर्ण क्षमतेने भरून धावेल, असा विश्वास रेल्वे प्रशासनाला आहे. त्यामुळे प्रवाशांना जलद, आरामदायक प्रवास तर मिळेलच, पण रेल्वेलाही आर्थिकदृष्ट्या फायदा होणार आहे.