नगरपंचायतीच्या कचरा डेपोला आग.

नगरपंचायतीच्या कचरा डेपोला आग.

कारंजा शहरात खळबळ : अग्निशमन दलाची धडपड.

कारंजा (घाडगे) शहरालगत विठ्ठल टेकडी भागात राष्ट्रीय महामार्गाजवळील नगरपंचायतच्या कचरा डेपोला अचानक आग लागली. आज दुपारी साडेबारा वाजेदरम्यान आगीचा भडका उडाल्याने त्याचा धूर आकाशात पोहोचला. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. अखेर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या मेहनतीने या आगीवर नियंत्रण मिळविले.

राष्ट्रीय महामार्गालगत टायर पंक्चर दुरुस्तीचे दुकान असल्याने बरेचदा दुकानदार येथे टायर जाळतात. त्यामुळे कोणीतरी टायर जाळले असावे, असा अनेकांचा समज झाला. परंतु नगरपंचायतचे कर्मचारी शहरातील कचरा घंटागाडीने कचरा घेऊन डेपोत गेल्यावर त्यांना आग लागल्याने निदर्शनास आले. सुरुवातीला त्यांनीच आग विझविण्याचा प्रयत्न केला.

पण, आग आटोक्यात येत नसल्याने नगरपंचायतने टैंकर बोलावून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी धडपड़ चालविली. त्यानंतरही आगीचा भडका कायम असल्याने लगतच्या वस्तीत राहणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. तेव्हा आष्टी येथील अग्निशमन दलाला पाचारण केले. ३ वाजता अग्निशमन दलाने दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळविले.

आग आटोक्यात आली असली तरीही धुराचे लोळ आकाशाकडे झेपावत होते. कारंजामध्ये अग्निशमन दलाचे वाहन देण्याची मागणी वारंवार करण्यात आली; परंतु शासनाने त्याकडे लक्ष दिले नाही. आतातरी प्रशासन व शासनाने गांभीर्य लक्षात घेऊन अग्निशमन दलाची व्यवस्था करून द्यावी, अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

fourteen − 1 =