मैदानी खेळांच्या अभावामुळे नवीन पिढी विविध आजारांच्या मगरमिठीत.
*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी*
» सुट्ट्यांमधील अतिरिक्त शिकवणीवर्गांचा भडिमार; ‘मामाच्या गावाची’ ओढ इतिहासजमा.
दारव्हा…शरीरयष्टीला बळकट, चपळ करणारे विविध प्रकारचे खेळ व मैदानापासून दुरावल्यामुळे बच्चेकंपनी लहान वयातच अनेक रोगांच्या विळख्यात सापडल्याचे दुर्दैवी चित्र आज सर्वत्र पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे सुट्टयांमध्ये असलेली खास “मामांच्या गावाची” ओढ देखील बदलत्या काळानुसार इतिहासजमा झाली असून शिकवणी वर्गांचा सतत सुरू असलेला भडीमार कितपर्यंत योग्य आहे, याची विस्तृत चर्चा होणे गरजेचे झाले आहे.
अनादिकाळापासून आपल्या देशात विविध खेळ व शारीरिक कवायतींना खूप महत्व प्राप्त आहे. गुरुकुल संस्कृतीमध्ये अर्धे गुण शिक्षण तर अर्धे गुण प्रत्यक्ष अनुभव किंवा शारीरिक श्रम कवायतींना दिले जात होते, असे अनेक पुरावे इतिहासात सापडतात. कुस्ती, कबड्डी, खोखो, धावणे, लंगडी, लोनपाट, डाबडुबली आदी अस्सल भारतीय बाण्यांचे खेळ याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. पूर्वी अनेक शाळा- महाविद्यालयांमध्ये कमीतकमी आठवड्यातून एकदा तरी ड्रिल किंवा इतर शारीरिक कवायती व्हायच्या.
मात्र पाश्चात्य संस्कृती व पाश्चात्य शिक्षणाच्या भडीमारामुळे येथील शिक्षण व्यवस्था तर पार कोलमडलीच, सोबतच त्याचे दुष्परिणाम आपण भारतीयांच्या आरोग्य व वयोमानावर स्पष्ट दिसत आहे. चिमुकल्यामध्ये लहान वयातच वृद्धत्त्व आल्यासारखे वाटते. पूर्वीच्या पिढीला उन्हाळी किंवा दिवाळीच्या सुट्टया लागण्याआधीच “मामाच्या गावाची” ओढ लागत असे. मात्र गणित, वैदिक गणित, इंग्लिश- स्पिकिंग क्लासेस, एबेकस, विज्ञान, नीट, जे- ईई, आयआयटी अशा अनेक गोंडस नावांमुळे चिमुकल्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. मूळ गावी किंवा नातेवाईकांकडे राहण्याची मनोमन इच्छा असूनही लवकर शाळा उघडल्यामुळे, शिकवणी वर्गामुळे किंवा शाळांना
सुट्टयाच नसल्यामुळे पालकांना मुलांच्या खातर लवकर यावे लागते किंवा घरातच अडकून राहावे लागते.
शाळेत, शिकवणी वर्गात किंवा घरीसुद्धा केवळ बसल्याशिवाय चिमुकल्यांना गत्यंतर नाही. त्यावर टीव्ही व मोबाईलने अधिकच कहर केला आहे. शाळेत भरपूर वेळ घालून शिकत असतांना अतिरिक्त मार्गदर्शन किंवा शिकवणी वर्गाची आवश्यकताच काय? असा प्रश्न उदभवतो. त्याऐवजी चिमुकल्याना एखाद्या क्रीडा प्रकारात टाकल्यास त्याचा दुहेरी फायदा त्यांना होऊ शकतो. क्रीडा स्पर्धेमध्ये एक- दोन वर्षाच्या सततच्या सरावामुळे चिमुकले जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीय पातळीवर यशस्वी झाल्यास शासकीय धोरणानुसार त्यांचे गुण तर वाढणारच सोबतच नोकऱ्यांमध्ये देखील त्यांना आरक्षण- सवलत मिळणे क्रमप्राप्त आहे.
शारीरिक श्रम किंवा खेळ व क्रीडेशी जुळल्यामुळे निरोगी जीवन व दीर्घायुष्य तर लाभतेच सोबतच उत्कृष्ट प्रदर्शन केल्यास किंवा त्या खेळात प्राविण्य प्राप्त केल्यास अमाप प्रसिद्धी व पैसासुद्धा मिळतो.
त्यामुळे चिमुकल्याना मैदानावर खेळू- बागडू द्या, त्यांचे बालपण वाया जाऊ नये, याकडे कटाक्षाने लक्ष द्या. अतिरिक्त शिकवणी किंवा ट्यूशनच्या भडीमारामुळे एखादा विद्यार्थी हुशारही निघाला व त्याला गलेगठ्ठ पगाराची नोकरी देखील मिळाली. मात्र शारीरिक श्रम व खेळांच्या अभावामुळे त्याची योग्य शारीरिक वाढ झाली नाही, त्याला एखादे रोग जडले असेल तर तो पगार- पैसा दवाखाना व औषधोपचारातच जाईल, ही वस्तुस्थिती कोणीही नाकारू शकत नाही, एवढे मात्र निश्चित