‘Lumpy’ मुळे पशुपालक त्रस्त, पशुवैद्यकीय अधिकारी सुस्त!
पानवाडीतील ग्रामस्थ आक्रमक: डॉक्टरच्या बदलीची मागणी.
वर्धा: तालुक्यातील मानवाडी या गावात जनावरांवर Lumpy प्रादुर्भाव असल्याने पुशपालक चिंतेत आहेत; परंतु या गावातील पशुवैद्यकीय दवाखाना एक शोभेची वास्तू ठरल्याने जनावरांना वेळीच उपचार मिळत नाही. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला असून येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष डुकरे यांची बदली करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
निसर्गाची अवकृपा आणि रोगांच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी आधीच अडचणीत सापडला आहे त्यातच आता जनावरांवर लम्पीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने जनावरेही मोठ्या प्रमाणात आजारी पडत आहेत. यासंदर्भात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतरही उपचाराकरिता पुढाकार घेतला जात नाही. दुपारी १२ वाजतानंतर पशुवैद्यकीय दवाखान्यात कोणताही कर्मचारी राहत नसल्याने योग्य उपचार होऊ शकत नाही.
तेथील कर्मचाऱ्यांकडून बेजबाबदारपणे उत्तरे दिली जातात. १ रुपयांच्या खुरीच्या इजेक्शनकरिता १० रुपये घेतले जातात. चाऱ्याचे बियाणे मोफत असताना त्याकरिता ५० रुपये आकारले जातात. येथील डॉक्टर व कर्मचारी शासकीय कामाकाजाच्या वेळेत खासगी दवाखाना सांभाळतात. दवाखान्यातील शिपायाला जनावरांना इजेक्शन द्यायला सांगतात.
असा सर्व सावळागोंधळ या पशुवैद्यकीय दवाखान्यात सुरू असून पशुपालकांची अडचण वाढत आहे. त्यामुळे येथील डॉक्टरची तातडीने बदली करून पशुपालकांच्या जनावरांवर योग्य उपचार उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी अनिल भुतडा, वि.शा. धुर्वे, जनार्दन बोटरे, केशव उईके, शामू श्रीनाथ, लिलाधर घोरपडे, गणेश देहारे, श्रीकांत ठाकरे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी केली आहे.