*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी*
नापिकीसोबतच कापसाच्या दरानेही केली निराशा.शेतकऱ्यांच्या अपेक्षा धुळीस; सरकार विचार करेल का ?
दारव्हा : सोयाबीनच्या पाठोपाठ कापसाच्या भावात सुद्धा मोठी घसरण झाली असून, कापसाचे भाव सहा हजार ४०० ते सहा हजार ७०० रुपये प्रतिक्विंटल आले असल्याने या भावात उत्पादन खर्च सुद्धा निघणे कठीण झाल्यामुळे शेतकऱ्यांची निराशा झाली आहे.कापसाचा भाव उतरल्याने कापूस विकावा की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे.
याअगोदर सोयाबीननेही शेतकऱ्यांची पुरती आर्थिक वाट लावली. काही ठिकाणी अतिवृष्टीने सोयाबीन पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी केल्यामुळे शेतकऱ्यांना एकरी सरासरी दोन ते तीन क्विंटलचा उतारा आल्यामुळे शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चही निघाला नाही.यंदा कापसाला चांगला भाव मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. परंतु अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा घात केला आणि कापसाची प्रत बिघडली. पीक चांगले दिसत असून सुद्धा बोंडअळीमुळे उत्पादनात घट.
आल्याने शेतकरी हताश झाला आहे.अवकाळीचा मोठ्या प्रमाणात कापसाच्या पिकाला फटका बसला असल्याने त्याचा उत्पादनावर मोठा परिणाम झाला. बोंडअळी व लाल्याचा प्रकोप सुद्धा दिसून येत असल्याने शेतकरी फवारणी करून हैराण झाला आहे. मागील वर्षी सुरुवातीच्या टप्प्यात कापसाला दहा हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला होता. यंदा हंगामाच्या सुरुवातीला साडेसात हजारांच्या वर भाव होता. यामध्ये वाढ होण्याची शेतकऱ्यांना आशा होती.
परंतु शेतकऱ्यांचे स्वप्न धुळीस मिळाले असून, भाव वाढण्याची आशा धूसर झाली आहे. सोयाबीनच्या पाठोपाठ कापसाच्या भावातही मोठी घसरण झाल्याने एका मागून एक येत असलेल्या संकटाने शेतकरी पूर्णतः त्रस्त झालेला आहे. शासनाच्या धोरणाने भावात घसरण झाल्याने शेतकऱ्यांनी जगावे तरी कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.त्यामुळे सरकारने यावर विचार करावा असा सूर तालुक्यातील हवालदील शेतकऱ्यांच्या मुखातून निघत आहे.