Kaamband Andolan: ६०० कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांची निषेधपत्रावर रक्तरंजित स्वाक्षरी.
Kaamband Andolan: मंगळवारी रक्तदान करताना कर्मचाऱ्याची प्रकृती ढासळली.
यवतमाळ: राष्ट्रीय आरोग्य अभियान याअंतर्गत येणारे कर्मचारी आणि अधिकारी यांनी गत २७ दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरीतसामावून घेण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. मात्र गत २७ दिवसात आंदोलनाची दखल झाली नाही. यामुळे कंत्राटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी रक्तरंजित स्वाक्षरी करीत मुख्यमंत्र्यांना निषेधाचे पत्र दिले.
यवतमाळातील शल्यचिकित्सक कार्यालयासमोर राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचारी आणि अधिकारी आंदोलन करीत आहेत. मंगळवारी या ठिकाणी ६०० कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून शासनाचा निषेध नोंदविला. यावेळी सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदविण्यासाठी रक्ताने माखलेले पत्र लिहिण्यात आले. या पत्रावर ६०० कंत्राटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
कर्मचारी अतिशय कठीण परिस्थितीत आंदोलन करीत आहे. यानंतरही त्यांच्या आंदोलनाची कुठलीही दखल घेण्यात आली नाही. रक्तदान करताना दोन कर्मचाऱ्यांना भोवळ आली. त्यांची प्रकृती ढासळली. त्यांना वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी नेण्याच्या सूचना करण्यात आल्या. मात्र यावेळी आंदोलकांनी उपचार घेण्यास नकार दिला.
परिस्थिती लक्षात घेता आंदोलनस्थळीच वैद्यकीय सेवा देण्यासाठी पाचारण करण्यात आले. दिवसभर चाललेल्या या आंदोलनात ८० कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. हे रक्त यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालयातील गरजवंतांना दिले जाणार आहे.