INDIA Alliance मध्ये सहभागी होण्याची मानसिक तयारी आम्ही केली आहे – Siddharth Mokle
वंचित बहुजन आघाडी नरेंद्र मोदी आणि भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कारण आम्हाला खात्री आहे की ते संविधाना सोबत छेडछाड करतील. त्यामुळे आम्ही INDIA Alliance सोबत जाण्याची राजकीय इच्छा व्यक्त केली. आमच्या या राजकीय इच्छेला दुर्बलता कोणी समजू नये. 2019 निवडणुकीच्या वेळीही आमची राजकीय ताकद क्षीण करण्यासाठी राजकीय षडयंत्र केले. मात्र ते यशस्वी झालं नाही, असे वक्तव्य Siddharth Mokle यांनी केले आहे.
इंडिया किंवा मविआ यांच्यात राजकीय समझौता झाला नाही, तर शिवसेनेबरोबर 24-24 जागा लढवण्याचा निर्णय झालेलाच आहे. यावरूनच वंचित बहुजन आघाडीचे राजकीय वजन महाराष्ट्राच्या राजकारणात किती आहे हे दिसते, असे देखील मोकळे म्हणाले आहेत. दिल्लीत झालेल्या इंडिया-मविआ आघाडीच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीच्या संदर्भात चर्चा झाली असे आम्हाला कळते. परंतु मविआ मधील एका घटकाने संमती न दर्शविल्याने निर्णय झाला नाही.
त्यामुळे संजय राऊत यांनी प्रेसमध्ये वंचित बहुजन आघाडीला घेण्यासंदर्भात जे वक्तव्य केले त्यातून जे पर्सेप्शन तयार झाले आहे ते चुकीचे आहे. जर राऊत म्हणाले त्याप्रमाणे सर्वांची सहमती आहे तर मग वांचितच्या समावेशाचे घोडे अडले कुठे? आणि जर सर्वसहमती नसेल तर असे वक्तव्य का करता?, असा प्रश्न देखील मोकळे यांनी उपस्थित केला आहे. ‘वंचित बहुजन आघाडी संविधान वाचवण्यासाठी पुढे आली आहे कारण तो आमच्या सन्मानाने जगण्याचा आणि सत्तेमध्ये जाण्याचा मार्ग आहे.
घटकपक्षाने सुद्धा एकमेकांचा सन्मान राखणे आवश्यक आहे. तो जर राखला जात नसेल तर मग जे काय समजून घ्यायचे ते घ्या.’ जागा वाटपाच्या चर्चेत आम्ही असलो तरच आम्हाला ही आघाडी बंधनकारक राहील. वंचित बहुजन आघाडीला जर जागावाटपाच्या चर्चेत सहभागी करून घेतले नाही तर महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी हे मान्य करेल का हा मोठा प्रश्न आहे.
त्यामुळे जोपर्यंत वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर या पक्षाच्या वतीने जाहीर करीत नाही. तोपर्यंत महाराष्ट्रात युती झाली असे लोकांनी समजू नये. इंडिया आघाडीची अशी वागणूक असली तरीही आम्ही इंडिया आघाडी मध्ये सहभागी होण्याची मानसिक तयारी केली आहे. पण ती बरोबरीचा सन्मानजनक पार्टनर म्हणून, घटकपक्ष म्हणून, appendix म्हणून नाही.