Gold Robbery: सुपरस्पेशालिटी’तील चार फ्लॅट फोडले; २५४ ग्रॅम सोने, रोख चोरी.

Gold Robbery: सुपरस्पेशालिटी’तील चार फ्लॅट फोडले; २५४ ग्रॅम सोने, रोख चोरी.

दोन अपार्टमेंट चोरांकडून लक्ष्य : परिसरातील सीसीटिव्ही बंद.

Gold Robbery: अमरावती येथील सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल वसाहतीत राहणाऱ्या चार कर्मचाऱ्यांचे फ्लॅट अज्ञात चोरट्यांनी फोडले. त्यात एका फ्लॅटमधून १८० ग्रॅम सोन्याचे व २५० ग्रॅम चांदीच्या दागिन्यांसह रोख ३ लाख असा ऐवज लंपास करण्यात आला. तर, दुसऱ्या फ्लॅटमध्ये सुमारे ७४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व १० हजार रुपये रोख, असा ऐवज चोरीला गेला. दोन वेगवेगळ्या अपार्टमेंटमधील अन्य दोन घरेदेखील फोडण्यात आली.

मात्र, तेथे चोरांच्या हाती काहीही लागले नाही. २९ ऑक्टोबर रोजी सकाळी या चारही घटना उघडकीस आल्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांसाठी त्याच परिसरात दोन तीन मजली वसाहती आहेत. यातील जिजाऊ या अपार्टमेंटमध्ये राहणारे गोपाल तेजुलाल लवारे (६३) हे कुटुंबासह मूळ गावी धामणगाव रेल्वेला गेले होते.

या काळात अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटच्या दाराचे कुलूप तोडून कपाटातील अंगठी, कानातील जोड, पोसह १८० ग्रॅम सोन्याचे दागिने, चांदी व रोख ३ लाख रुपये असा लाखोंचा ऐवज लांबविला. त्यानंतर चोरट्यांनी याच वसाहतीत राहणाऱ्या भुजाडे यांच्या बंद फ्लॅटलाही लक्ष्य केले. मात्र, त्यांच्या फ्लॅटमध्ये चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही.

दरम्यान, वसाहतीत राहणाऱ्या नागरिकांच्या ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी तातडीने गोपाल लवारे व भुजाडे यांना कॉल करून चोरीची माहिती दिली. त्यानुसार त्यांनी तातडीने फ्लॅट गाठून पाहणी केली. त्यानंतर घटनेची माहिती गाडगेनगर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.

याबाबत माहिती मिळाल्यावर गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळ गाठून पाहणी केली. यावेळी ठसे तज्ज्ञ व श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. याप्रकरणी लवारे यांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी गुन्हा नोंदविला. गाडगेनगरचे ठाणेदार गजानन गुल्हाने व गुन्हे शाखा प्रमुख आसाराम चोरमले यांनी सुपरच्या वसाहती गाठल्या होत्या.

अहिल्या अपार्टमेंटमध्येही चोरी.

सुपरमधील जिजाऊ अपार्टमेंटलगतच्याच अहिल्या नामक अपार्टमेंटमधील तिसऱ्या मजल्यावरील दोन सदनिका फोडण्यात आल्या. तेथील नितीन सवाळे यांच्या सदनिकेतून ७४ ग्रॅम सोन्याचे दागिने व १० हजार रुपये रोख लंपास करण्यात आली. सवाळे यांच्यालगतचा एक फ्लॅटदेखील फोडण्यात आला. दोन्ही अपार्टमेंट हे तीनमजली असून तेथे प्रत्येकी १२ फ्लॅट आहेत. मात्र, तेथील सीसीटिव्ही कॅमेरा बंदावस्थेत दिसून आले. तेथे सकाळी खळबळ उडाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

7 − 3 =