Darwha Rain: अवघ्या अर्ध्या तासात गारपीट, वादळी पावसाने पीक नेस्तनाबूत.
*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी*
Darwha Rain: तालुक्यात रविवारला वादळवाऱ्यासह पडलेला पाऊस व गारपिटीचा तडाखा बसला. यात काही गावातील रब्बी व उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रविवारला सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास प्रचंड वादळवाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. काही प्रमाणात हरभऱ्याच्या आकाराची गार पडली.
केवळ अर्धा, एक तासाच्या आपत्तीमुळे तालुक्यातील काही गावांमध्ये खोपडी, डोल्हारी देऊळगाव, अंतरगाव पाथ्रड देवी धामणगाव (देव), कोहळा, करंजगाव, बोदेगाव यासह अनेक गावातील हरभरा, गहू, तीळ, बाजरी, भाजीपाला, फळबाग आदींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यावर्षी खरीप हंगामात दोनदा अतिवृष्टीने तडाखा दिला. त्यामुळे उत्पन्नावर मोठा परिणाम झाला.
त्याचबरोबर रबी हंगामातसुद्धा काही दिवसात दोनदा वादळवाऱ्यासह पाऊस व गारपीट झाली. सततच्या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाला आहे. त्यामुळे तातडीने सर्वे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.
दारव्ह्यात सोंगणीला आलेल्या रब्बी पिकांचे नुकसान.
रविवारी संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सोंगणीला आलेल्या रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाने सोंगणीला आलेल्या गहू, हरभरा या पिकांना मोठा फटका बसला आहे. तालुक्यात ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला.
तालुक्यातील धामणगाव (देव), कोहळा, करंजगाव, बोदेगाव यासह परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे गव्हाचे पीक आडवे पडले असून, हरभरा पिकांचेही नुकसान झाले आहे. तसेच सोंगणीस आलेल्या रब्बी पिकांचे जास्त प्रमाणात नुकसान झाले आहे.