DA Hike for Employees : महाराष्ट्रातील राज्य शासकीय कर्मचारी आणि पेन्शनधारक यांना महागाई भत्ता (DA) वाढीबाबत अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. या पार्श्वभूमीवर आता एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता लवकरच वाढवण्यात येणार असल्याचे समजते.
देशातील अनेक राज्यांमध्ये केंद्र सरकारच्या धर्तीवर महागाई भत्ता वाढवण्यात आला आहे. केंद्र सरकारने मार्च महिन्यात कर्मचाऱ्यांचा DA ५३ टक्क्यांवरून ५५ टक्क्यांपर्यंत वाढवला.
त्यानंतर राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड या राज्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी DA वाढ केली. मात्र, महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांना अद्याप ५५ टक्के दराने भत्ता मिळालेला नाही. तरीसुद्धा, लवकरच या दराने DA लागू केला जाणार असून तो जानेवारी २०२५ पासून प्रभावी होईल, अशी माहिती आहे.
दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत लवकरच ७ टक्के महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. सध्या एसटी कर्मचाऱ्यांना ४६ टक्क्यांच्या दराने DA दिला जातो. राज्यातील इतर शासकीय कर्मचाऱ्यांना ५३ टक्के दराने DA मिळतो. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कमी आहे. यासंदर्भात कर्मचाऱ्यांकडून अनेकदा मागणी करण्यात आली होती.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ५ मे २०२५ रोजी माध्यमांशी संवाद साधताना, एसटी कर्मचाऱ्यांना याच महिन्यात महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळेल असे आश्वासन दिले. राज्य मंत्रिमंडळाच्या येत्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचा भत्ता ४६ टक्क्यांवरून थेट ५३ टक्क्यांपर्यंत वाढणार आहे.
या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, आता अधिकृत घोषणा कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महागाईच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे.