Costly Medicine : सलाईन २५ रुपयांचे; पाचशेत दिले जात असेल तर करा तक्रार!
Costly Medicine : अशा औषध विक्रेत्याला सात वर्षांच्या शिक्षेची तरतूद.
सध्या सर्व जिल्ह्यांत व्हायरलची साथ सुरू आहे. त्यामुळे सलाईनचा धंदा जोरात आहे. अनेक रुग्णालयांत २२ ते २५ रुपयांत मिळणारे सलाईन ४०० ते ५०० रुपयांपर्यंत दिले असल्यास त्याची तक्रार अन्न व औषध प्रशासनाकडे करा, असे आवाहन केले जात आहे. या संदर्भात सध्यातरी एकही तक्रार नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
व्हायरलची साथ जोरात.
बदलत्या वातावरणाचा शरीरावर प्रभाव पडतो. सध्या डेंग्यू, डेंग्यू संशयित ताप व व्हायरलची साथ जोरात सुरू आहे. वृद्ध व लहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात सर्दी, खोकला व ताप ही व्हायरलची लक्षणे दिसून येत आहेत.
मेयो, मेडिकलची तीन हजारांवर ओपीडी
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा (मेडिकल) ओपीडीत येणाऱ्या रुग्णांची संख्या तीन ते चार हजारांवर गेली आहे. यात व्हायरलच्या रुग्णांची संख्या मोठी असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
सलाईनची किंमत २३ रुपये
सलाईनची किंमत कुठे २२ रुपये ३० पैसे तर कुठे २३ ते २५ रुपये असते. जर खासगी हॉस्पिटलमध्ये एमआरपीपेक्षा जास्त किमतीत सलाईनची विक्री केली जात असेल तर तशी तक्रार अन्न व औषध प्रशासनाकडे करता येते.
‘एफडीए’कडे तक्रार करा
अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त मिरज लोहकर यांनी लोकमतला सांगितले, एमआरपीपेक्षा अधिक किमतीत औषधी विकल्यास व त्यात दोषी आढळल्यास कायद्यानुसार औषध विक्रेत्याला सात वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. सध्या या संदर्भात कोणतीही तक्रार नाही. परंतु असे होत असल्यास त्यांनी अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करावी.
‘एमआरपी’पेक्षा कमी किमतीत औषधांची विक्री
नागपूर शहरातील अनेक खासगी हॉस्पिटलमध्ये औषधांच्या एमआरपी १० ते १५ टक्के सूट दिली जाते. लोकमत प्रतिनिधीने रामदास पेठ, धंतोली, मेडिकल, इंदोरा, मानेवाडा, रामनगर या भागांतील खासगी हॉस्पिटलला भेट देऊन सलाईनच्या किमतीची विचारणा केली असता त्यांनी एमआरपी दरापेक्षा कमी किमतीत उपलब्ध करून देण्यास तयारी दर्शवली.