BJP State President Maharashtra : महाराष्ट्रात महायुतीमध्ये सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपने विधानसभा निवडणुकीत घवघवीत असे यश मिळविले आहे.राज्यात भाजपचा मुख्यमंत्री हा लक्ष्य ठेवून भाजपने आपले महाराष्ट्र मिशन फत्ते केले आहे. यानंतर महाराष्ट्राचा भाजपचा नवीन प्रदेशाध्यक्ष कोण होणार याकडे पक्ष संघटना,पदाधिकारी, नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागलेले आहे.
महाराष्ट्र विधानसभेत भाजपचे नेतृत्व करणारे चंद्रशेखर बावनकुळे हे कॅबिनेट मंत्री झाल्याने प्रदेशाध्यक्ष पदाची जागा खाली होणार आहे. राज्यात मराठा आरक्षण आणि निवडणुकीपूर्वी भाजप विरोधी विविध लाटेला बावनकुळे यांनी समर्थपणे हाताळल्याने राज्यात भाजपला यश मिळाले असे भाजपमध्ये बोलल्या जात आहे.त्यामुळे निवडणुकीनंतर आता चंद्रशेखर बावनकुळे यांना महायुती 2.0 मध्ये कॅबिनेट मंत्री पद मिळाले आहे.
रविवारी चंद्रशेखर बावनकुळे यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतल्याने एक व्यक्ती एक पद या नियमानुसार भाजपमध्ये प्रदेशाध्यक्षाची जागा खाली होणार आहे.त्यामुळे आता त्यांच्या जागी भाजप हायकमांड महाराष्ट्रात कोणत्या नेत्याला प्रदेशाध्यक्षाची बनण्याची संधी देते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. यासाठी सध्या दोन नावांची चर्चा सुरू झाली आहे.
या दोन पैकी कोण होणार भाजपचा नवा प्रदेशाध्यक्ष.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर आता सरकारची स्थापना होताच नवे भाजप प्रदेशाध्यक्ष पदाचा मान कुणाला मिळणार हे भाजप हाय कमांड जरी ठरवत असले तरी मजबूत बहुमत घेऊन आलेले महायुती सरकारचे नवे मुख्यमंत्री भाजपचे राज्याचे चाणक्य समजले जाणारे देवेंद्र फडणवीस आहेत. त्यामुळे राज्यात मजबूत सरकार असल्याने भाजप प्रदेशाध्यक्ष पदावर सुद्धा मजबूत नेता हवा असा दृष्टिकोन महाराष्ट्र भाजपमध्ये दिसतोय.त्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी राज्यात सध्या दोन नावांची जोरदार चर्चा आहे.
रवींद्र चव्हाण आणि प्रवीण दरेकर यांचे नाव समोर आले आहे. रविवारी माहिती सरकारच्या मंत्रिमंडळ शपथविधी दरम्यान भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष कोण होणार यावर सुद्धा भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये मुंबई आणि दिल्लीमध्ये चर्चा रंगू लागली होती. कारण यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे हे कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेत होते.
त्यामुळे या दरम्यान रवींद्र चव्हाण नवे प्रदेशाध्यक्ष होतील यावर चर्चा होताना दिसली. तर शपथविधीच्या दुसऱ्या दिवशी भाजपचे मजबूत नेते प्रवीण दरेकर यांच्या नावावर ही चर्चा सुरू झाली. भाजपचे अंतर्गत गटात दिल्ली हाय कमांड महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दरेकर यांना देणार अशी चर्चा आहे.
पडद्यामागे मजबूत काम करणारे प्रवीण दरेकर.
महाराष्ट्र भाजपमध्ये प्रवीण दरेकर यांचा प्रभाव दिसतो. विविध निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्यासह त्यांनी मोलाची भूमिका बजावली. दरम्यान विधानसभा 2024 च्या निवडणुकीतही दरेकर हे पडद्यामागे राजकीय गोट्या फिट करून, भाजपला विधानसभा मतदारसंघ निहाय मजबुती देण्यासाठी जुंपलेले होते.
देवेंद्र फडणवीस यांचे खूप निकटवर्ती मानले जाणारे प्रवीण दरेकर यांच्याकडे यापूर्वी विधानपरिषदेच्या विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी होती. त्यामुळे यंदा विधानसभा निवडणुकीनंतर महायुती सरकार मध्ये त्यांना मंत्री न बनविता,आता पक्ष संघटन आणि महाराष्ट्रात भाजपला आणखी मजबुती देण्यासाठी दरेकर यांना प्रदेशाध्यक्ष पदासाठी योग्य नेता पक्षांतर्गत मानले जात आहे.
विशेष म्हणजे मागील काही काळापासून महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा ज्वलंत होत असताना भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी यादरम्यान पक्षासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. मराठा ओबीसी आरक्षण वाद सुरू असताना त्यांनी यात पक्षासाठी जातीय समीकरण साधताना पक्षाला विधानसभा निवडणुकीत यश मिळावे, यासाठी आटोकाट प्रयत्न केल्याचे बोलल्या जात आहेत.त्यामुळे भाजप महाराष्ट्राचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.
तर दुसरीकडे निवडणुकीनंतर महाराष्ट्रात नवे मुख्यमंत्री कोण होणार यावर चर्चा होत असताना अचानक दिल्लीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी रवींद्र चव्हाण यांच्या नावावर सुद्धा चर्चा सुरू झाली होती त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या गोटात काहीशी अस्वस्थता दिसून आली, मात्र त्यांच्या नावावर गंभीरतेने चर्चा झाली नसल्याने पुन्हा रवींद्र चव्हाण यांच्या नाव समोर आला नाही.
आता त्यांना कॅबिनेटमध्ये न घेता आता त्यांना वेट अँड वॉच मध्ये ठेवण्यात आले आहे. त्यामुळे रवींद्र चव्हाण हे सुद्धा मजबुतीने प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीत असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे या दोन्ही नेत्यांपैकी कुणाला पदाची जबाबदारी मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.