प्रतिनिधी | यवतमाळ : गावात सुरू अवैध दारू विक्रीवर पायबंद बसवण्याच्या दृष्टीने ठाणेदार ज्ञानोबा देवकते यांनी गोधणी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. त्यानंतर एकाच दिवसात ग्रामस्थांनी एकत्रीत येवून दारूबंदीचा निर्णय घेतला. दरम्यान दुसऱ्याच दिवशी सकाळीच अवधुतवाडी पोलिसांनी गाव गाठून दारू विक्रेत्यांना चांगलाच चोप दिला.गेल्या चार वर्षांपासून यवतमाळ शहरालगतच्या गोधणी गावात दारू विक्री बंद होती. तरी सुध्दा काही जणांनी अवैध दारू विक्री सुरू केली होती.
यामूळे लहान मुलांसह वयोवृद्धांमध्ये सुध्दा व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत होते. तर दारू विक्रेत्याने गावात दादागिरी सुरू केली. त्यामुळे ग्रामस्थांनी विरोध करणेही बंद केले होते.मात्र या अवैध दारूमुळे मोठ्या प्रमाणात तरूण, नागरिक दारूच्या आहारी जात होते. त्यामूळे गावात भांडण-तंटे वाढत चालली होती. अशात गोधणीतील दारूबंदीसाठी महिला, गावकरी आणि तरूणांनी अवधुतवाडी ठाणेदार ज्ञानोबा देवकते यांची भेट घेत व्यथा मांडली. दरम्यान शनिवार, दि. १८ नोव्हेंबरला सायंकाळी ठाणेदार देवकते यांनी गोधणी ग्रामपंचायतमध्ये सभा घेतली.
यावेळी महिला, नागरिक आणि तरूणांना दारूमुळे होणारे दुष्परिणाम, गावाच्या विकासाकडे होणारे दुर्लक्ष, याबाबत मार्गदर्शन केले.या मार्गदर्शनाचा सकारात्मक परिणाम दिसून आला आणि एकाच दिवशी गाव दारूबंदी मुक्त व्हावे, असा निर्णय घेण्यात आला. यावेळी सरपंच राजू डंभारे, सुभाष तोडसाम, राजू मानकर, शंकर भिसे, अजाब मारेकर, सुनील नगराळे, धनंजय राहाते, देविदास मेश्राम, पोलि पाटील मंगेश मानकर, वर्षा खोब्रागडे, सुरेखा टेकाम, नंदा दोंदलकर यांच्यासह शेकडो महिला उपस्थित होत्या. अशात दुसऱ्याच दिवशी रविवार सकाळीच ठाणेदार ज्ञानोबा देवकते यांच्यासह अधिकारी, कर्मचारी गोधणी गावात दाखल झाले. त्यानंतर गावातील महिलांच्या उपस्थितीत अवैध दारू विक्रेत्याच्या घरांची झडती घेत त्यांना चांगलाच चोप दिला.तसेच दारू विक्री केल्यास कठोर कारवाई करण्याची तंबी दिली.