Ajit Pawar Meet Sharad Pawar : शरद पवारांच्या घरी अचानक पोहोचले अजित पवार आणि म्हणाले ‘मी घरातलाच…..
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज अचानक दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी पोहोचले.आणि बाहेर आल्यानंतर त्यांना मीडियाकर्मींनी गराडा घातला. यावेळी प्रश्नांचा भडीमार होत असताना आपल्या शैलीत अजित दादांनी माध्यमांना उत्तर देताना म्हटले की,मी बाहेरचा कुठे,मी घरातलाच माणूस आहे…….त्यामुळे मी येथे आलो आहे. अजित दादा म्हणाले आज आमच्या मध्ये सामान्यपणे चर्चा झाली राजकीय विषयावर कोणतीच चर्चा झाली नाही आम्ही विविध मुद्द्यांवर चर्चा केली यात राजकीय विषयांच्या समावेश नव्हता, राजकीय विषयांपलीकडे अनेक विषय असतात, मी आज शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो,असे अजित दादा पवार यांनी स्पष्ट करीत राजकीय चर्चांना विराम दिला.
विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार हे अजित पवार यांचे सखे काका आहेत.त्यामुळे वेळोवेळी त्यांची भेट होताना राजकीय स्तरावर विविध चर्चाही समोर येत असतात.
याचे कारण म्हणजे यापूर्वी 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असलेले शरद पवार यांच्या नेतृत्वात अजित पवार महाविकास आघाडी मध्ये उपमुख्यमंत्री पद सांभाळले होते. मात्र राज्यात अचानक शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि आमदारांनी राजकीय बंड पुकारले होते. यानंतर भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट एकत्रित येऊन महायुतीची सत्ता स्थापित झाल्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये बंड पुकारून महायुतीमध्ये सामील होऊन ते उपमुख्यमंत्री झाले होते.
त्यापूर्वी काय झालं होत.
राज्यात महायुती अस्तित्वात नसताना आणि 2019 च्या निवडणुकीनंतर राज्यात भाजप आणि शिवसेने मध्ये मुख्यमंत्री पदावरून मतभेद उजागर होऊन शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे हे युतीमधून बाहेर पडले होते. यादरम्यान महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी भाजप विरुद्ध शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये घडामोडी होत असताना अचानक भाजपसोबत हात मिळवणी करून अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारांना सोबत घेऊन पहाटेच भाजप नेते आणि सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. पण अजित पवार यांच्या या राजकीय भूमिकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक आमदारांनी समर्थांन न दिल्याने अजित पवार यांचा तेव्हा बंड फसला होता.यावेळी त्यांना पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परत यावे लागले होते. मात्र त्यांच्या या पक्षांतर्गत बंडातून महाराष्ट्रातील राजकारणात दिग्गज अशा पवार घराण्यात शरद पवार यांचे राजकीय उत्तराधिकारांची लढाईसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांची पक्षांमध्ये भूमिका समोर आली होती.
यानंतर अजित पवार यांनी पुन्हा थेट बंड पुकारून.
राष्ट्रवादीचे 40 आमदारांना सोबत घेऊन ते महायुती सकारात सामील झाले होते. यानंतर पवार काका पुतण्यांमध्ये हा पक्षात राजकीय मतभेद जगजाहीर झाला होता.आताही अजित पवार महायुतीमध्ये असून त्यांनी पुन्हा उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळला आहे.
2024 महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीनंतर शरद पवार आणि अजित पवार या दोघांच्या भेटीची आज पहिलीच वेळ होती.त्यामुळे शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या अजित पवार आणि त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली यावर माध्यमांचे लक्ष लागले असताना अजित पवार यांनी आज आपल्या शैलीत प्रतिक्रिया दिली.
आज होता शरद पवार यांचा वाढदिवस.
राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवारांचा गुरूवार 12 डिसेंबर रोजी 85 वा वाढदिवस साजरा केला जात असताना दिल्लीमध्ये अजित पवार शरद पवार यांच्या घरी अचानक पोहोचले होते त्यामुळे, महाराष्ट्राच्या राजकारणाला पुन्हा काही नवा आणि वेगळं असं वळण मिळतो की काय अशी राजकीय शंका सकाळपासून उपस्थित केली जात होती. याचे कारण म्हणजे अजित पवार आणि शरद पवार या दोघांची 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडल्यानंतर सार्वजनिकरित्या भेट झाली नव्हती.पण शरद पवारांचे पुतणे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गुरुवारी आपल्या कुटुंबासह दिल्लीमध्ये सकाळी अचानकपने शरद पवारांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले.
अजित पवार कुटुंबीय पक्षनेत्यांसोबत शरद पवारांच्या भेटीला.
विशेष म्हणजे महायुती सरकारच्या खातेवाटपाच्या चर्चेसाठी अजित पवारही गेल्या दोन दिवसांपासून नवी दिल्लीतच आहेत. यादरम्यान आज शरद पवार यांचा वाढदिवस होता.त्यामुळे सकाळी अजित पवारांबरोबर त्यांच्या पत्नी राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार,पुत्र पार्थ पवारही आणि प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, खासदार सुनील तटकरेही शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. या सर्वांचे शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दारात स्मित हास्य करून स्वागत केले.आणि नंतर पवार काका पुतण्यांची भेट होऊन हे सर्व बाहेर पडले.
ऑपरेशन लोटसच्या शक्यतेमुळे सर्वांची होती भेटीवर नजर.
यात विशेष म्हणजे महाराष्ट्रात बुधवारी भाजपकडून ऑपरेशन लोटस होणार असल्याची आणि महाविकास आघाडीत असलेले शरद पवार यांचे राष्ट्रवादी पक्षातील काही खासदार भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू आहे. आज पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवार आणि त्यांच्या पक्षाचा पूर्ण काफीला दिल्लीमधील त्यांच्या निवासस्थानी पोहोचल्याने याचा वेगळा असा राजकीय अर्थ सकाळपासून लावला जात होता. मात्र अजित पवार यांनी आपण पवार घराण्यातील असल्याने आपल्या काकांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी येथे पोहोचलो असल्याची प्रतिक्रिया देत,एकूणच राजकीय चर्चाना विराम देण्याच्या प्रयत्न केला.