*प्रतिनिधी राहुल सोनोने (मळसूर)*
पातुर तालुक्यातील आलेगाव येथील शुक्रवारी रात्रीची घटना.
पातुर: स्थानिक वंजारीपुरा भागातील रहिवासी असलेले पत्रकार सचिन मुर्तडकर यांच्या घरात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून सगळे कुटुंबीय झोपलेले असतांना घरातील कपाटातून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह नगदी रोख असा एकूण तब्बल पावणे सहा लाख रुपयांचा ऐवज लंपास करण्याची घटना घडली. याचवेळी गावातील आणखी दोन घरे फोडल्याचे सकाळी निदर्शनास आले. या घटनेने तालुक्यात खळबळ निर्माण झाली असून याबाबत पोलीस पुढील तपास करीत आहेत.
या घटने प्रकरणी सचिन मुर्तडकर यांनी चान्नी पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की ते गुरुवारी (दि. 2) रात्री जेवण करून झोपण्यापूर्वी साडेअकरा वाजेपर्यंत मोबाईल पाहत होते. त्यानंतर त्यांना झोप लागली. शुक्रवारी (दि. 3) रात्री 3 वाजताच्या सुमारास त्यांच्या भावाच्या पत्नीला जाग आली. तेव्हा त्यांना घरात काही साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले.
हे साहित्य कपाटातील असल्याने त्यांना काहीतरी विपरीत घडल्याचा संशय आला. त्यांनी घरातील सर्व कुटुंबीयांना जागे केले. तेव्हा घरातील सर्व कपाट तपासले असता घरातील कपाटांमधील सोन्याचे दागिने व नगदी रोख रक्कम चोरीला गेल्याचे लक्षात आले. कपाटामध्ये दोन सोन्याच्या अंगठ्या, एक सोन्याची साखळी, दोन लहान मुलांच्या सोन्याच्या अंगठ्या, कर्णफुलांचा जोड, सोन्याची एकदानी यासह नगदी रोख रक्कम असा तब्बल 5 लाख 73 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.
विशेष म्हणजे सर्व कुटुंबीय घरातच झोपलेले असतांना ही चोरी झाली. घराच्या मागील बाजूला असलेल्या ग्रीलच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केल्याचे दिसून आले. कुटुंबीयांनी घराच्या आजूबाजूला काही अंतरापर्यंत तपास घेतला असता घरापासून जवळच असलेल्या एका शेतामध्ये ज्या बॉक्समध्ये सोन्या-चांदीचे दागिने ठेवले होते ते रिकामे बॉक्स पडलेले आढळून आले.
याशिवाय एक नवा कुकर आढळून आला. हा कुकर कुणाचा आहे याची माहिती मिळाल्यानंतर त्यांचे घरी जाऊन पाहिले असता आणखी दोन घरे फोडल्याचे दिसून आले. परंतु या दोन्ही घरी कोणी राहायला नसल्याने घरातून नेमके काय सामान चोरीला गेले ते समजू शकले नाही. दरम्यान या घटनेची माहिती चान्नी पोलिसांना दिल्यानंतर चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय चव्हाण यांच्यासह ठसे तज्ञ, श्वानपथक घटनास्थळी हजर झाले. स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही घटनास्थळी हजर झाले. पोलिसांनी सर्व घटनेची नोंद घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.