आलेगावात गावठी दारू अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा.
*पातुर तालुका प्रतिनिधी राहुल सोनोने (मळसुर)*
1 लाखाचा मुद्देमाल जप्त, तिघांना घेतले ताब्यात.
पातूर: आलेगाव येथील निर्गुणा नदीपात्रात गावठी दारूच्या अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचा-यांनी गुरुवारी सकाळी छापा टाकून तीन जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गावठी दारूसह 1 लाख 4 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आलेगाव परिसरात 100 ते 150 हातभट्टी दारू विक्रीची दुकाने मोठ्या थाटात सुरू आहेत. चान्नी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली.
कारवाई दरम्यान 80 लिटर गावठी दारू किंमत 8 हजार रुपये, 960 लिटर सडवा मोह किंमत 96 हजार रुपये असा एकूण 1 लाख 4 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सय्यद युसुफ सय्यद जहागीर (52) रा. इस्लामपुरा आलेगाव, निसार खान जावेद खान (32) रा. मोमीनपुरा आलेगाव यांना चान्नी पोलिसांनी ताब्यात घेतले.
दारु विक्रेत्याची मुजोरी.
दोन दिवसांपूर्वी चान्नी पोलिसांनी गावठी दारू विक्री करणा-याविरुद्ध छापा टाकून कारवाई केली असता, त्या आरोपीने चान्नी पोलिस ठाण्यातील कर्मचा-यांला दगड फेकून मारला होता. तसेच अश्लिल शिवीगाळ केली होती. तसेच महिलांना पुढे करण्यात आले होते. या माध्यमातून आमच्या अवैध धंद्याकडे लक्ष देऊ नका, अन्यथा आम्हीच उलटपक्षी तुमच्या विरुद्ध कारवाई करण्यास भाग पाडू, असा काहीसा हा प्रकार असल्याची चर्चा होत आहे.
विषारी द्रव्य टाकून बनवली जाते गावठी दारू युरिया, बिबे, नवसागर, शेतात वापरली जाणारी विषारी द्रव्याचे काही प्रमाण या दारूमध्ये टाकल्या जात असल्याची धक्कादाक माहिती समोर आली आहे. गावठी दारूवर थातूरमातूर कारवाई करण्यात येते. सकाळी कारवाई झाल्यानंतर संध्याकाळी पुन्हा दारूची दुकाने सुरू केली जातात.
हे धक्कादायक वास्तव आहे. याकडे वरिष्ठ पोलिसांनी लक्ष देणे गरजेचे आहे. कायद्यातील तरतुदीप्रमाणे विषारी द्रव्यापासून दारू तयार करणा-यांविरुद्ध कलम 328 प्रमाणे कारवाई होऊ शकते, मात्र तसे होताना दिसून येत नाही.