जिल्ह्यात उद्योगवाढीसाठी अॅडवांटेज चंद्रपूर इंडस्ट्रियल एक्सपो अँड बिजनेस कॉन्क्लेव्ह चे आयोजन.
*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी प्रमोद खिरटकर*
चंद्रपूर जिल्हा प्रशासन, एम.एस.एम.ई., एमआयडीसी व एमआयडीसी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने, दि. 4 व 5 मार्च 2024 रोजी अॅडवांटेज चंद्रपूर “इंडस्ट्रियल एक्सपो अँड बिजनेस कॉन्क्लेव्ह”चे आयोजन वन अकादमी येथे करण्यात येत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून हा नाविन्यपूर्ण उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.
या कार्यक्रमाकरीता केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत याशिवाय उद्योग क्षेत्रातील नामांकित कुमार मंगलम बिर्ला तसेच अदानी ग्रुपचे पार्थ अदानी यांना सदर कार्यक्रमाकरीता आमंत्रित करण्यात आले आहे. या इंडस्ट्रियल एक्सपो च्या माध्यमातून नवउद्योजकांना प्रेरित करणे.
जिल्ह्यातील उद्योगधंद्यांची माहिती विविध घटकांपर्यंत पोहोचविणे तसेच प्रस्थापित उद्योगांना जिल्ह्यातील उद्योगपूरक वातावरणाची माहिती देऊन उद्योगवाढीस प्रेरणा देणे, जिल्ह्यामध्ये विविध उद्योगाबरोबरच सामंजस्य करार(एमओयु) करणे याबाबत नियोजन असून चंद्रपूर जिल्ह्याची निगडित खनिज उद्योग, स्टील उद्योग, सिमेंट, स्टार्टअप, एफ.आय.डी.सी. अॅग्रो बेस इंडस्ट्रीज, पर्यटन, थर्मल पावर स्टेशन, बांबू इंडस्ट्रीज, सोलर, बँकिंग अशा विविध विषयांवर चर्चासत्र तसेच लगतच्या जिल्ह्यातील 200 उद्योजकांचे स्टॉल सदर उपक्रमामध्ये ठेवण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होणे अपेक्षित आहे. चंद्रपूरमध्ये होणाऱ्या गुंतवणुकीकरीता सामंजस्य करार (एमओयु) करण्यात येणार असून या औद्योगिक एक्सपो करीता जिल्ह्यातील औद्योगिक संस्थांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.
लोगो अनावरण.
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते अॅडवांटेज चंद्रपूर “इंडस्ट्रियल एक्सपो अँड बिजनेस कॉन्क्लेव्ह” लोगोचे अनावरण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, मनपा आयुक्त विपीन पालीवाल आदी उपस्थित होते.