दुर्मिळ जातीचा हा विषारी साप महाराष्ट्रात आढळला.
*बाभुळगाव तालुका प्रतिनिधि मोहम्मद अदीब*
आसेगाव देवी येथे मृत अवस्थेत आढळला अत्यंत दुर्मिळ जातीचा विषारी पोवाळा साप!
बाभुळगाव तालुक्यात आसेगाव देवी येथील नागरिक शोभागिर भुराणी यांच्या घरी साप असल्याची माहिती सर्पमित्र वैभव खोडे यांना मिळाली. सपमित्र वैभव खोडे यांनी घटनास्थळी जाऊन साप बघितला असता हा साप अत्यंत दुर्मिळ जातीचा व विषारी पोवाळा साप मृत अवस्थेत आढळला. या सापाचे इंग्रजी नाव ‘स्लेंडर कोरल स्नेक’ असून याचे शास्त्रीय नाव ‘कॅलोफीस मेल्यान्यूरस’ असे आहे. बाभुळगाव तालुक्यांमध्ये या जातीच्या सापाची पहिल्यांदाच नोंद झाली आहे.
हा साप एकदम निमुळता असून तो साधारण बावीस इंचापर्यंत लांब वाढतो. याचा रंग मातकट असून डोळे काळे व डोक्यावर पांढरे ठिपके आहेत. तसेच यांच्या शेपटीला दोन रंगाच्या रिंगा असून पोटाकडील बाजूस लालसर व शेपटी खाली निळसर राखाडी रंग आहे. या सापळा चिडवल्यास तो आपले लक्ष डोक्याकडून विचलित करण्यासाठी शेपटीचे वेटोळे घालतो व शेपटी खालील लालसर व निळसर रंग दाखवतो. आतापर्यंत या जातीच्या सापाची नोंद गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, गोवा, पश्चिम बंगाल या राज्यात तसेच बांगलादेश व श्रीलंका या देशात झालेली आहे.